मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाची ५० टक्के कामे पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाची ५० टक्के कामे पूर्ण
मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाची ५० टक्के कामे पूर्ण

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाची ५० टक्के कामे पूर्ण

sakal_logo
By

मुंबईचे रूपडे पालटतेय
सुशोभीकरण प्रकल्पाची ५० टक्के कामे पूर्ण

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पातील ५० टक्के कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण झाली असल्‍याने महानगराचे रूप पालटत असल्‍याचे चित्र पाहायला मिळत आहे. यासोबतच विविध कामांना वेग आला असून पालिका आयुक्‍त इक्‍बाल सिंह चहल जातीने लक्ष देत असल्‍याने ही कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला जात आहे.

पालिकेचा विशेष प्रकल्प असलेला मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, यंदाच्या पावसाळ्यापूर्वी करावयाची विविध कामे, तसेच जी-२० परिषदेच्या आगामी बैठका या सर्व पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून प्रगतिपथावर असलेली तसेच नियोजित कामे यासंदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली, त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, आशीष शर्मा, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या जी २० परिषदेसाठी पालिकेने महानगरातील सुशोभीकरण कामांच्या माध्यमातून एक नवा आदर्श देशातील इतर शहरांसमोर ठेवला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये मुंबईत पार पडलेल्या पहिल्या बैठकीवेळी केलेल्या कामांपेक्षादेखील अधिक उत्कृष्ट कामे या वेळी करण्यात आली, असे आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले. पालिकेने आपली कामगिरी उंचावत ठेवणाऱ्या केलेल्या कामांमुळे केंद्र आणि राज्य शासनानेही पालिकेचे कौतुक केले आहे. त्याबद्दल संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अभिनंदनास पात्र आहे, असे सांगतानाच फक्त जी-२० परिषदेपुरती अशी कामगिरी मर्यादित न राहता, मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून या कामांचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना कायमस्वरूपी आला पाहिजे, असेही आयुक्त म्हणाले.

नालेसफाईच्या कामांना वेग
मार्च महिन्यात नुकताच झालेला पाऊस हा मागील आठ दशकांमध्ये महिन्यात झालेला सर्वाधिक पाऊस ठरला. वातावरणीय बदलांमुळे हवामानाच्या लहरीपणाचा फटका संपूर्ण जगाला बसतो आहे आणि मुंबईलाही त्याचे अनुभव येत आहेत. अशा स्थितीत यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील लहान-मोठ्या सर्व नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने आणि योग्यरीतीने पूर्ण करावीत, त्या कामाची पाहणी करावी, जी-२० परिषद- मुंबई सुशोभीकरण व नियमित देखभालीची कामे यामुळे रस्त्यांच्या पुनर्पुष्ठीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी त्यांचा आढावा घेऊन रस्त्यांची कामे जलदगतीने करावीत, असे निर्देश पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

काँक्रिटीकरण कामांचीही करणार पाहणी
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यावर भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची १११ कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या काळात प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. काँक्रिटीकरणासह रस्त्यांची इतरही सर्व कामे योग्यरीतीने होत आहेत, याकडे रस्ते विभागाने लक्ष ठेवावे, अशी सूचना आयुक्तांनी केली.

स्वच्छतादूतांची नेमणूक करणार
मुंबईत ५ हजार स्वच्छतादूत नेमण्याच्या दृष्टीने धोरण ठरल्यानंतर आता स्वच्छता दूतांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एप्रिलअखेरपर्यंत सर्व स्वच्छता दूत नेमले जातील, अशा रीतीने प्रक्रिया वेगवान पद्धतीने राबवावी, अशा सूचनाही आयुक्तांनी यंत्रणेला दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नियमितपणे मुंबई सुशोभीकरण कामांचा आढावा घेत असतात. प्रकल्पात पहिल्या टप्प्यात ५००; तर दुसऱ्या टप्प्यात ३२० व इतरही अतिरिक्त अशी एकूण १,०७७ कामे हाती घेतली आहेत. यापैकी ६१३ कामे पूर्ण झाली आहेत. म्हणजे ५० टक्के कामे ठरल्याप्रमाणे मार्चअखेर पूर्ण झाली आहेत.
- इक्‍बाल सिंह चहल, पालिका आयुक्‍त