६० लाखांच्या अमली पदार्थासह तिघे गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

६० लाखांच्या अमली पदार्थासह तिघे गजाआड
६० लाखांच्या अमली पदार्थासह तिघे गजाआड

६० लाखांच्या अमली पदार्थासह तिघे गजाआड

sakal_logo
By

ठाणे, ता. १ (वार्ताहर) : शहरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोन घटनांत नायजेरियन नागरिकांसह एका रिक्षाचालकाला गुन्हे शाखा युनिट ५ च्या पोलिस पथकाने अटक केली. याप्रकरणी श्रीनगर आणि कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांत पोलिसांनी ६० लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

ठाणे गुन्हे शाखा युनिट ५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे २९ मार्च रोजी घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथील द बाईक सूरज प्लाझा हॉटेल परिसरात सापळा लावण्यात आला होता. पॉल चुकवू (वय ४८, रा. तुळिंज, पालघर) ही नायजेरियन व्यक्ती संशयास्पद फिरताना आढळून आल्याने त्याच्या अंगझडतीत पोलिसांना १२ लाख ८० हजारांचे ३२ ग्रॅम कोकेन आणि १.२० लाखांचे ०.२२ ग्रॅम एलएसडीचे १५ नग, तसेच एक हजार ९४० रुपये रोख आणि मोबाईल फोन असा एकूण १४ लाख एक हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी त्याच्याविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आले.

दुसऱ्या कारवाईत नायजेरियन व्यक्ती कोकेन विक्रीसाठी श्रीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची माहिती होती. त्यानुसार पोलिस पथकाने वागळे इस्टेट, इंदिरानगर येथील शिवसेना शाखेसमोर शुक्रवारी (ता. ३१) सापळा रचला होता. गोक लॉरेन्स अजाह (वय ३२, रा. नालासोपारा, जिल्हा पालघर) ही नायजेरियन व्यक्ती आणि मुद्देमाल रिक्षातून घेऊन वाहतूक करणारा रिक्षाचालक लक्ष्मण अनिरुद्ध साव (वय २७, रा. इंदिरानगर चाळ, सांताक्रूझ) यांची तपासणी केली. त्यांच्याकडे ४६ लाख रुपये किमतीचे ११५ ग्रॅम कोकेन सापडले. त्यांच्याविरोधात श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत कोकेनसह एक रिक्षा आणि एक हजार रुपये रोख असा एकूण ४७ लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.