नैसर्गिक अपत्तीशी लढण्यासाठी आपदा मित्र

नैसर्गिक अपत्तीशी लढण्यासाठी आपदा मित्र

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ठाणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये नैसर्गिक आपत्तीजनक परिस्थिती ओढवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पूर, भूस्खलन, चक्रीवादळ अशा आपत्तीच्या काळात मदतीसाठी धावून जाणे गरजेचे आहे. नैसर्गिक संकटाच्या काळात जीवितहानी होणार, याची दक्षता घेत एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, पोलिस घटना स्थळी जातात; परंतु त्वरित मदत मिळावी, यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपदा मित्रांची फौज तयार केली आहे. यात ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, ठाणे परिसरात ५०० आपदा मित्रांना प्रशिक्षण दिले आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भूस्खलन, पूर, अतिवृष्टी, दरड कोसळणे अशा नैसर्गिक दुर्घटना वाढू लागल्या आहेत. आपत्तीजनक परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मात्र ही मदत अधिक जलद होण्याच्या दृष्टीने नवीन यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. दुर्घटनास्थळी बचाव करण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची फौज निर्माण केली जात आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपदा मित्र या योजनेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.
......
डिसेंबरपासून प्रशिक्षण सुरू
गेल्या चार महिन्यांत तब्बल ५०० तरुण प्रशिक्षित झाले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिली. डिसेंबर महिन्यापासून या प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून त्यामध्ये एनसीसी, एनएसएस, सिव्हिल डिफेन्स, सोशल वर्कर, पोलिस पाटील, ग्रामसेवक, कोतवाल, सरपंच अग्निशमन कर्मचारी अधिकारी, सामाजिक कार्याची आवड असणारे इत्यादी व्यक्ती आपदा मित्र म्हणून काम करणार आहेत. १२ दिवसांच्या प्रशिक्षणात चक्रीवादळ, भूस्खलन, पूर, अतिवृष्टी, दरड कोसळणे आगीवर नियंत्रण, सर्पदंशापासून बचाव आदी विविध गोष्टी शिकवण्यात आल्या आहेत.
...
याचे प्रशिक्षण
आपदा मित्र या प्रशिक्षणात आपत्ती दुर्घटनेत काय करावे आणि काय करू नये, बचाव कार्य कसे करावे आदी मार्गदर्शन केले गेले असून प्रथमोपचार, पूर परिस्थिती आणि बचाव कार्य, फायर सेफ्टी, ट्रेकिंग, सर्पदंश व विंचूदंश उपचार पद्धती, हवामानातील बदल व समाजावर होणारा परिणाम, गर्दी व्यवस्थापन, मानवी शरीर प्रणाली, कृत्रिम श्वसोच्छ्वास, बँडेज, गाठीचे प्रकार इत्यादी माहिती प्रशिक्षणार्थीना देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांनी दिली.
...........
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आपदा मित्र याला ओळखपत्र, प्रमाणपत्र, याबरोबर प्रत्येक आपदा मित्राचा पाच लाखांचा विमा काढला जाणार आहे. प्रत्येक आपदा मित्राला एक किट देण्यात आले आहे. यामध्ये बॅटरी, हेल्मेट, गमबूट, लायटर, चाकू, लाईफ जॅकेट आदी वस्तू असून यामुळे मदत कार्यवेळी आपदा मित्र महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.
- सुदाम परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com