आयआयटी आत्महत्याप्रकरणी एका विद्यार्थ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयआयटी आत्महत्याप्रकरणी
एका विद्यार्थ्याला अटक
आयआयटी आत्महत्याप्रकरणी एका विद्यार्थ्याला अटक

आयआयटी आत्महत्याप्रकरणी एका विद्यार्थ्याला अटक

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : आयआयटीतील दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) एका विद्यार्थ्याला रविवारी (ता. ९) अटक केली. अरमान इकबाल खत्री असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो दर्शनचा वर्गमित्र होता. दरम्यान, या प्रकरणी एसआयटीने आतापर्यंत दोघांचे जबाब नोंदवले आहेत.
मुंबई आयआयटीत प्रथम वर्ष अभियांत्रिकीत शिकणाऱ्या दर्शन सोळंकीने १२ फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. या प्रकरणी एसआयटीला नुकतीच दर्शनची सुसाईड नोट सापडली. त्यानुसार पोलिसांकडून चिठ्ठीत नाव नमूद केलेल्यांची चौकशी केली जात आहे. त्यानुसार आज अरमान खत्री या वर्गमित्राला अटक करण्यात आली. १० फेब्रुवारीला दर्शनने त्याच्याशी झालेल्या जुन्या वादासंदर्भात आपली माफी मागितल्याचे अरमानने चौकशीदरम्यान एसआयटीला सांगितले; परंतु या दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला, हे मात्र अद्याप समोर आले नाही. दरम्यान, अरमान हा चौकशीत पुरेशी माहिती देत नसल्यामुळे त्याची लाय डिटेक्टर चाचणी करण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
---
दर्शनची समजूत
एसआयटीने या प्रकरणी उदयसिंह मिना नावाच्या व्यक्तीचाही जबाब नोंदवला. एका विद्यार्थ्याला दर्शन सोळंकीच्या जातीबाबत कळाल्यानंतर त्याने आपल्याशी बोलणे बंद केल्याचे दर्शनने मिनाला सांगितले होते. त्यावेळी मिनाने संबंधित मित्र बोलत नसेल तर जाऊ दे; तू दुसऱ्या मित्रांसोबत बोलत जा, अशा शब्दांत दर्शनची समजूत काढल्याचे एसआयटीला सांगितले.
---
दर्शनच्या पालकांचे आक्षेप
एसआयटीने शोधलेल्या सुसाईड नोटवर दर्शनच्या पालकांनी आक्षेप घेतला. सुसाईड नोटवरील हस्ताक्षर दर्शनच्या हस्ताक्षरासारखे दिसत नसल्याचा दावा त्याचे वडील, बहिणी आणि आत्याने केला. यापूर्वी मात्र त्याच्या आईने सदर हस्ताक्षर दर्शनसारखे दिसत असल्याचे सांगितले होते.