
गावितपाड्यात बोहाडा उत्साहात साजरा
विक्रमगड, ता. १० (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील आदिवासी संस्कृतीची परंपरा जोपासणारा जगदंबे मातेचा उत्सव अर्थात ‘बोहाडा’ या उत्सवाला ग्रामीण भागात सुरुवात झाली आहे. विक्रमगड तालुक्यातील गावितपाडा येथे हनुमान जन्मोत्सवानंतर बोहाडा भरवला जातो. ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे. बोहाडा उत्सवात पारंपरिक वेशभूषा परिधान करून देव-देवतांची सोंगे नाचवली जातात. रामायण व महाभारतातील देव-दानवांच्या लढाया नाट्यरूपात सादर केल्या जातात. ही सर्व बोहाडा सोंगे पारंपरिक संबळ, सनईच्या तालावर सादर केली जातात. इंद्र, राम, कृष्ण, हनुमान, रावण, होडी, अंबाबाई, विविध देव-देवतांची रात्रभर सोंगे काढली जातात. बोहाड्यात हजारो भाविकांची गर्दी होत असते. सकाळच्या वेळी जगदंबा मातेची सोंगे काढली जातात. जगदंबा मातेला नवस केले जातात. ते नवस पूर्ण झाल्यावर भाविकांकडून बकरा, कोंबड्याचा बळी दिला जातो. आदिवासी ग्रामीण भागात ही प्रथा रूढ आहे.