देसई-बेलवड रस्त्यासाठी सोमवारी धरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देसई-बेलवड रस्त्यासाठी सोमवारी धरणे
देसई-बेलवड रस्त्यासाठी सोमवारी धरणे

देसई-बेलवड रस्त्यासाठी सोमवारी धरणे

sakal_logo
By

वाडा, ता. १० (बातमीदार) : तालुक्यातील पूर्व भागातील देसई ते बेलवड या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहने चालवणे जिकीरीचे झाले आहे. केवळ तात्पुरती डागडुजी केली जात असल्याने रस्ता दरवर्षी खड्ड्यात जातो. त्याचा त्रास या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात यावे, या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी वाडा पूर्व विभाग संघर्ष समितीच्या वतीने २१ मार्च रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात १५ एप्रिलपर्यंत रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र अद्यापही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे १७ एप्रिल रोजी बांधकाम कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
वाडा पूर्व विभागात देसई, कासघर, शिरसाड, तिळसा, बालिवली, मोज, बिलघर, कळंभे, सोनाळे, निशेत आदी गावे आहेत. या गावांसाठी वाडा-देसई-बेलवड हा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. दरवर्षी रस्त्यावर मलमपट्टी करून कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो; मात्र यावर ठोस काम केले जात नाही. या रस्त्याचे काम १५ एप्रिलपर्यंत न झाल्यास सोमवारी (ता. १७) हजारो ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाला धरणे आंदोलन करू, असा गंभीर इशारा वाडा पूर्व विभाग संघर्ष समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.