बालस्वास्थासाठी आरोग्य विभाग सरसावला

बालस्वास्थासाठी आरोग्य विभाग सरसावला

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुलांमध्ये विविध आजार मोठ्या प्रमाणात बळावले असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील बालकांचे स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला आहे. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी स्तरावरील ० ते १८ वयोगटातील सर्व बालक तपासणी करण्यात आली असून यापैकी बालकांपैकी १७० बालकांमध्ये हृदयसदृश आजार आढळून आले आहेत. या सर्वांच्या हृदयाची काळजी घेत, जिल्हा आरोग्य विभागाकडून यशस्वीरीत्या हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया ० ते ६ वयोगटातील बालकांची करण्यात आली आहे; तर, हर्निया, अंडकोषवृद्धी अपेन्डिक्स आदी आजार आढळून आलेल्या एक हजार ३५ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
राज्य शासनाचा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यामध्ये विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी, खासगी अनुदानित शाळांमधील आणि महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात येत असते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत चार लाख नऊ हजार ५५ अंगणवाडी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी तीन लाख ३७ हजार ८५२ बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ० ते ६ वयोगटातील ११६ बालकांमध्ये तर, ६ ते १८ वयोगटातील ५४ बालकांमध्ये हृदयाशी निगडित आजार आढळून आले असून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य पथकामार्फत अंगणवाडी आणि शालेय स्तरावरील ० ते १८ वयोगटातील सर्व बालक तपासणी करण्यात आली. यात हर्निया, अंडकोषवृद्धी अपेन्डिक्स आदी आजार आढळून आलेल्या एक हजार ३५ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
......................................
३२ पथकांची नेमणूक
राष्ट्रीय आरोग्य अभियानाने जिल्ह्यात ३२ पथके नेमण्यात आली आहेत. या एका पथकात एक पुरुष डॉक्टर, एक महिला डॉक्टर, एक परिचारिका आणि औषध वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तीन विविध टप्प्यात मुलांची तपासणी करण्यात येत आहे.
...
हृदयशस्त्रक्रिया
विभाग - ० ते ६ वय- ६ ते १८ वय
ग्रामीण क्षेत्र -४८- ३०
शहरी क्षेत्र -६३- २०
नगरपालिका क्षेत्र- ०५ - ०४
......................................
इतर शस्त्रक्रिया
विभाग - ० ते ६ वय- ६ ते १८ वय
ग्रामीण क्षेत्र - ३१५ - ३९३
शहरी क्षेत्र - १८३ - ६७
नगर पालिका - ३१ - ४६
......
ठाणे जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांचे स्वस्थ निरोगी राहावे, यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालकांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये ज्या बालकांना गंभीर आजार व त्यावरील शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. अशा बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्यानुसार मागील वर्षभरात १७० हृदयशस्त्रक्रिया तर, एक हजार ३५ इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्याचिकीत्सक, ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com