
अवकाळीचा जव्हारला सर्वाधिक फटका
वसई, ता. ११ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे सात कोटी ८७ लाख ३६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तर दुसरीकडे २० मार्चनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा जव्हार तालुक्याला बसला आहे. यात एकूण १२ हजार १५३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
डहाणू, जव्हार, मोखाडा विक्रमगड भागात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चार तालुक्यात एकूण १८ हजार ८६९ शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असून तयार झालेला शेतमाल खराब झाला. यात कडधान्य, भाजीपाला, आंबा आणि काजूचे प्रचंड नुकसान झाले. आंब्याचा मोहोर गळून गेल्याने ऐन हंगामातच हापूस, पायरी आणि अन्य जातीच्या आंब्याची केलेली लागवडीची पुरती विल्हेवाट लागली. अवेळी पावसाने झालेले शेतीचे नुकसान पाहता शेतजमिनीवर जाऊन पंचनामे करावेत यासाठी कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी दिलीप नेरकर यांनी पालघर जिल्ह्यात पंचनामे करण्यासाठी तालुक्यातील संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यानंतर पहिल्या टप्प्यात चार तालुक्यात अधिक नुकसान झाल्याचे समोर आहे. तर २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने तीन तालुक्यांना झोडपल्याचे समोर आले आहे. याबाबत देखील पंचनाम्याची कार्यवाही करण्यात आली आहे. हातातोंडाशी आलेले पीक पावसाने हिरावून नेले असतांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
....
शेतकरी आर्थिक संकटात
एकीकडे कष्ट, आर्थिक खर्च करून पिकवलेले धान्य, फळबागा यावर अवकाळी पावसाची अवकृपा झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी विभागाने किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले यासाठी पथक नेमुन पंचनामे केले. यात सात कोटींहून अधिकचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर २० मार्चला देखील अवकाळी पाऊस झाला होता त्यामुळे देखील पिकांची नासधूस झाली आहे.
-----------------------
आकडा वाढण्याची शक्यता
२० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर, डहाणू व वाडा तालुक्यात शेती बागायतीचे नुकसान झाले आहे. हे पंचनामे देखील पूर्ण होत आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या व नुकसानीचा आकडा वाढणार आहे.
-------------------------
पालघर जिल्ह्यात विविध पिके घेतली जातात. अत्याधुनिक शेती केली जाते व यावर कुटुबांचा उदरनिर्वाह केला जात आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरोनापासून ते आजतागायत अनेकदा बागायतीला नुकसान सहन करावे लागत आहे.
- शिवा तुंबडा, शेतकरी
........
पालघर तालुक्यात २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती बायगतीचे किती प्रमाणात नुकसान झाले याबाबत पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. हे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले असून त्यानंतर अहवाल तयार करण्यात येईल.
- तरुण वैती, कृषी अधिकारी, पालघर