वैद्यकीय यंत्रणा सक्रिया करा

वैद्यकीय यंत्रणा सक्रिया करा

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) ः उल्हासनगर शहरात मंगळवारी (ता. ११) एकाच दिवशी ८ कोविड रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोविड रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली. ही बाब गांभीर्याने घेत पालिका आयुक्त अजीज शेख यांनी तातडीने बैठक बोलावून वैद्यकीय यंत्रणा सक्रिय करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

महापालिका कार्यक्षेत्रात बस स्थानक, रेल्वे स्थानक, रिक्षा स्टँड व गर्दीच्या ठिकाणी कोविड- १९ तपासणीमध्ये वाढ करण्यात यावी, नागरी आरोग्य केंद्र स्तरावर फिवर क्लिनिक सुरू करण्यात यावेत, सर्व खासगी रुग्णालयांची खाटांची संख्या व आवश्यक साधनसामग्री अद्यावत करून घेण्यात यावी, कोविड-१९ लसीकरण कार्यक्रम तत्काळ सुरू करण्यात यावा, आदी आदेश आयुक्त अजीज शेख यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/टिश्यू वापरावे, कोविड आजाराचे लक्षणे आढळल्यास तत्काळ नागरी आरोग्य केंद्र-१ ते ६ येथे संपर्क साधवा, संशयित रुग्णांनी घरीच विलगीकरण व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोविड आजाराची तपासणी रेड क्रॉस सेंटर, उल्हासनगर ३ येथे मोफत करण्यात येत आहे. आजारासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना व मुबलक प्रमाणात औषधसाठा नागरी आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध केलेला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी. यासंदर्भात शासनाने दिलेल्या सूचनांचे व नियमांचे तंतोतंत पालन करावे. सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे व सतर्क राहावे, असे आयुक्त अजीज शेख यांनी म्हटले आहे. मागच्या आठवड्यापासून पालिका कोविडवर गांभीर्याने उपाययोजना करत असल्याचे शेख यांनी सांगितले. या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिता सपकाळे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्टर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com