विठ्ठल सायन्ना रुग्णालयाचे पाडकाम सुरू

विठ्ठल सायन्ना रुग्णालयाचे पाडकाम सुरू

ठाणे, ता. १५ : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागी हेलिपॅड असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकरच उभारण्यात येणार आहे. यासाठी जीर्ण झालेल्या इमारतीचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे. रुग्णालयाची मुख्य इमारत भूमिपूजनानंतर पाडण्यात येईल, असे सांगितले जात होते. पण, ती इमारत सोमवारी पाडण्यास सुरुवात झाली. या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू झाल्याच्या घटनेला १५ एप्रिल रोजी ८७ वर्षे पूर्ण झाली.

विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालय पाडून त्याच ठिकाणी ९०० बेड्सचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे. यामध्ये ५०० बेड्सचे जिल्हा रुग्णालय, प्रत्येकी २०० बेड्सचे सेवा आणि महिला व बाल रुग्णालय असणार आहे. मध्यंतरी रुग्णालयाच्या आवारातील जीर्ण झालेल्या इमारती पाडून तेथे नवे रुग्णालय उभारण्याची शासनाने परवानगी दिली असून बांधकामासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. आता जीर्ण झालेल्या इमारतीचे पाडकाम हाती घेण्यात आलेले आहे. त्यानुसार नेत्र विभागाची इमारत, एआरटीची इमारत आदी इमारती पाडून झाल्या आहेत. त्यामुळे आता मुख्य इमारत आणि प्रशासकीय कामकाज चालणारी इमारत पडणे बाकी आहे. या इमारतीमधील जिल्हा शल्य चिकित्सक आणि निवासी जिल्हा शल्य चिकित्सकांची केबिन, नेत्र विभाग, औषध विभाग, रक्ततपासणी आणि लेबर ओपीडी असे विभाग तातडीने त्या रुग्णालयाच्या आवारातील इतर इमारतीत स्थलांतरित करून ती इमारत रिकामी केली आहे; तर प्रशासकीय कामकाज आता नर्सिंगच्या इमारतीतून केला जाणार आहे.
---
विठ्ठल सायन्नांचा पुतळा हलवणार
तळमजल्यावर विठ्ठल सायन्ना यांचा अर्धाकृती पुतळा आहे. तो पुतळा विधिवत पूजन करून स्थलांतरित केला जाणार आहे. तो पुतळा सद्यस्थितीत वागळे इस्टेट येथील आरोग्य विभागाच्या शासकीय जागेत उभारलेल्या रुग्णालयाच्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा तो पुतळा तेथे बसवला जाईल, असे सांगण्यात आले आहे. आता रुग्णालयाच्या आवारात अपघात विभाग आणि किचन विभाग असलेली इमारत पाडायची राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com