
वाड्यात श्रमजीवी संघटनेचा मोर्चा
वाडा, ता. १३ (बातमीदार) : विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. १३) वाडा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व किशोर मढवी, भरत जाधव यांनी केले. आदिवासी वाड्या-वस्त्यांवरील पाणीटंचाईवर तत्काळ मात करून त्यांना पिण्याचे पाणी द्यावे, आदिवासी बांधवांना घरकुलांचा लाभ द्यावा, सिंचन विहीर, शेत तलाव, आदिवासी वाड्या-वस्त्यांना रस्त्याची सुविधा द्यावी, देवघर ग्रामपंचायत येथील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, पेसा निधीच्या खर्चाची माहिती देण्यात यावी आदी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी आंदोलकांनी ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चात तालुका अध्यक्ष जानू मोहनकर, तालुका संपर्कप्रमुख रफिक चौधरी, सचिव सूरज दळवी, महिलाप्रमुख प्रमिला तरसे, रेखा पराड, करुणा मुकने आदींसह शेकडोच्या संख्येने श्रमजीवी कार्यकर्ते उपस्थित होते.