मुंबई ते ठाणे प्रवास सुसाट होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईतील पूर्व उपनगराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्पातील मानखुर्द ते ठाणे दिशेकडील छेडानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाचा तसेच सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कपाडिया नगर ते वाकोला जंक्शन या उन्नत मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे मुंबई ते ठाणे प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे.
मानखुर्दहून ठाणे दिशेकडील १.२३ किलोमीटर लांबीच्या दोनपदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे मानखुर्दहून ठाणे दिशेकडील वाहतूक सिग्नलमुक्त होऊन पूर्व द्रुतगती महामार्गावरील नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत होईल. तसेच नवी मुंबईहून येणारी वाहनेही आता विनाव्यत्यय ठाण्याच्या दिशेने प्रवास करतील. सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता विस्तार प्रकल्पाच्या पहिल्या भागातील कुर्ला ते वाकोला, रझाक जंक्शनपर्यंत ३.०३ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाचे लोकार्पण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विद्यमान सांताक्रूझ-चेंबूर रस्त्याद्वारे (एससीएलआर) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडण्यासाठी एमएमआरडीए राज्य सरकारच्या सहकार्याने या जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करत आहे. दोन्ही द्रुतगती महामार्गांना एकमेकांशी जोडणाऱ्या या सिग्नलविरहित डबल डेकर उन्नत मार्गामुळे वाहतुकीच्या वेळेत जवळपास ४५ मिनिटांची बचत होईल.
मुंबई महानगर प्रदेशातील सर्व भागांची जलद जोडणी करण्याच्या दृष्टीने प्राधिकरण कार्यतत्परने सर्व प्रकल्पांचे लोकार्पण करत आहे. आज उद्घाटन झालेल्या उड्डाणपुलामुळे ठाण्याच्या दिशेने प्रवास आता विना व्यत्यय आणि सिग्नल विरहित होणार आहे. तसेच सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पातील कापडिया नगर ते वाकोला जंक्शन उन्नत मार्गामुळे मुंबईच्या पूर्व व पश्चिम भागाची जोडणी सुकर झाली आहे.
- एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.