राज्याकडून तुटवड्यमुळे पर्यायी लशीची पडताळणी

राज्याकडून तुटवड्यमुळे पर्यायी लशीची पडताळणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : राज्यात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही कोविडविरोधी लशींचा साठा शून्य असल्याने राज्य आरोग्य विभाग इनकोव्हॅक आणि कोर्बेव्हॅक्स लशींकडे लक्ष केंद्रित करत आहे. मुंबईत सध्या दोन खासगी रुग्णालये कोव्होव्हॅक्स लस देत आहेत. पुण्यात सर्वाधिक पर्याय उपलब्ध आहेत.
राज्य सरकारने कोविडसाठी हेटरोलॉजस बूस्टरचा पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे आणि बूस्टर डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी इनकोव्हॅक आणि कोर्बेव्हॅक्स लस खरेदी करण्याची योजना आखत आहे. सध्या राज्यात कोविड रुग्णांमध्ये वाढ होत आहे आणि कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा थोडासाही साठा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार, बूस्टर डोससाठी पाच कोटी प्रौढ लाभार्थी शिल्लक आहेत.
एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले, की त्यांनी भारत बायोटेक आणि बायोलॉजिकल ई लिमिटेड या उत्पादकांशी संवाद सुरू केला आहे. वितरण उपलब्ध साठ्यावर अवलंबून असेल. भारत बायोटेक-निर्मित इनकोव्हॅक ही जगातील पहिली इंट्रानेसल लस आहे आणि ती काही खासगी रुग्णालयांमध्ये ९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. दरम्यानच्या काळात, कोर्बेव्हॅक्स गेल्या वर्षी १२ ते १४ वयोगटासाठी देण्यात येणार होती; मात्र त्यानंतर हेटरोलॉजस लशीला बूस्टर डोस म्हणून मंजूर करण्यात आले. महाराष्ट्रातील पाच लाखांहून अधिक प्रौढ लाभार्थ्यांना प्रिकॉशन डोस म्हणून कोर्बेव्हॅक्स आधीच मोफत देण्यात आला आहे. ही लसदेखील काही खासगी रुग्णालयांमध्ये ३८६ रुपयांना उपलब्ध आहे. एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले, की लाभार्थ्यांना बूस्टर डोस म्हणून वेगवेगळ्या लशी देणे सोयीचे नाही. शिवाय इनकोव्हॅकसाठी कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे इच्छुक लाभार्थी स्लॉट बुक करत नाहीत.
...
लसीकरणासाठी इच्छुक लोकांच्या संख्येत गेल्या सहा महिन्यांत लक्षणीय घट झाली आहे. मोजक्याच इच्छुक नागरिकांना लस दिली जात आहे. लोकांना कोविडची भीती वाटणे कमी झाले आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी राज्यातील पात्र लोकसंख्येपैकी १५ ते १६ टक्क्यांपेक्षा कमी लोकांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे.
- डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com