कल्याणकारी योजनांसाठी महिलांची झुंबड

कल्याणकारी योजनांसाठी महिलांची झुंबड

हेमलता वाडकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे महापालिकेच्या समाज कल्याण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्‍वत:च्‍या पायावर उभे राहण्यासाठी या वर्षी महिलांची झुंबड उडाली आहे. जन्माला येणाऱ्या मुलीच्या पालनपोषणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानापासून एकाकी पडलेल्या महिलांपर्यंत पालिकेच्या विविध १२ योजना आहेत. त्या राबवण्यासाठी १५ कोटींचा निधीही मंजूर आहे; पण या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या नऊ हजार ८३५ इतकी असताना तब्बल २२ हजार १९९ अर्ज प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये निकषानुसार १९ हजार ९२९ महिला पात्र ठरल्या आहेत. म्हणजे तब्बल १० हजार गरजू महिला पात्र असतानाही या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गरजू महिलांना आर्थिक आधार देत त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे विविध योजना राबवण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने कचरा वेचक महिलांच्या मुलांना शैक्षणिक अर्थसहाय्य, विधवा-घटस्फोटित महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी अर्थसाह्य, दुर्धर आजाराने ग्रस्त महिलांच्या उपचारासाठी मदत, ६० वर्षांवरील विधवा, घटस्फोटित महिलांच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान, गुडघे प्रत्यारोपण, कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने एकल आयुष्य जगणाऱ्या महिलांचे पुनर्वसन याशिवाय खेळाडू महिलांना अनुदान आणि मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदान अशा १२ योजनांचा समावेश आहे. पाच हजार ते ५० हजारांपर्यंतचे अर्थसहाय्य समाज विकास विभागाकडून दिले जाते.
------------------
प्रशासनापुढे नवीन पेच
यंदाही २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध योजनांसाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत; परंतु यंदा एकूण उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले असल्याची आकडेवारी समोर आली आहे. पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय मंडळींनी प्रभागातील गरजू महिलांचे अर्ज भरून ते पालिकेत सादर केले आहेत; पण आता एकूण लाभार्थी संख्येपेक्षा अडीच पट जास्त अर्ज प्राप्त झाल्याने आणि त्यातही पात्र महिलांची संख्या दुपटीहून अधिक असल्याने कुणाला ‘न्याय’ द्यायचा, असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. या सर्वच पात्र महिलांना या योजनांचा लाभ मिळवून देण्याची मागणी जोर धरू लागल्याने प्रशासनापुढे नवीन पेच निर्माण झाला आहे.

एकल, व्याधीग्रस्त महिलांची समस्या गंभीर
कल्याणकारी योजनांमध्ये सर्वाधिक अर्ज हे एकल आयुष्य जगणाऱ्या, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांचे आले आहेत. दुर्धर आजाराने ग्रस्त ३२४ महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार अनुदान देण्यात येणार आहे; मात्र त्यासाठी एक हजार १५८ अर्ज आले असून, एक हजार तीन महिला पात्र ठरल्या आहेत. एकल आयुष्य जगणाऱ्या एक हजार ९८ महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी २५ हजार अनुदान मंजूर आहे; पण एक हजार ७६४ अर्ज प्राप्त झाले असून, दीड हजार महिला पात्र ठरल्या आहेत. नोंदणीकृत ४५० बचत गटांना प्रत्येकी १५ हजार अनुदान मंजूर आहे. इथेही ११७९ बचत गटांनी अर्ज केले असून, ११२५ पात्र ठरल्या आहेत.

खेळाडूंचीही कसरत
महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीही महिला व बालकल्याण योजनेंतर्गत अनुदान दिले जाते. या वर्षी जिल्हास्तरीय खेळात अनुदान मिळवण्यासाठी ७४ जणींनी अर्ज केले आहेत. वास्तविक त्यापैकी ६३ पात्र ठरल्या असल्या, तरी प्रत्यक्ष लाभ मात्र १८ खेळाडूंनाच मिळणार आहे. राज्यस्तरीय महिला खेळाडूंनाचीही हीच स्थिती आहे. एकूण नऊ लाभार्थी संख्या असताना ५३ अर्ज आले असून, ४८ महिला खेळाडू पात्र ठरल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com