बोर्डीत स्वच्छतेचा बोजवारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोर्डीत स्वच्छतेचा बोजवारा
बोर्डीत स्वच्छतेचा बोजवारा

बोर्डीत स्वच्छतेचा बोजवारा

sakal_logo
By

बोर्डी, ता. १७ (बातमीदार) : प्रशासकीय राजवटीत बोर्डी गावाच्या स्वच्छतेचा बोजवार उडाला आहे. अनेक ठिकाणी प्लास्टिक कचऱ्याच्या घाणीचे साम्राज्य असून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बोर्डी येथील समुद्रकिनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याच्या कामात मात्र कोणताही खंड पडत नसल्यामुळे फक्त स्वार्थ असेल तेथेच काम करायचे का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
पाच महिन्यांपासून बोर्डी ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशांत जाधव प्रशासक म्हणून; तर समिधा पाटील ग्रामसेविका म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची मुदत संपल्यामुळे आपल्या कामाची जबाबदारी संपली म्हणून हात वर करण्यात आले आहेत. तसेच प्रशासक, ग्रामविस्तार अधिकारी व माजी उपसरपंच नॉट रिचेबल असल्याने याबाबत कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

-------------
स्वच्छतेसाठी लाखो रुपयांचे साहित्य
ग्रामपंचायतीच्या विविध भागांत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तसेच ग्रामपंचायतीला मिळालेल्या स्वच्छता अभियानाच्या पारितोषिकाच्या रकमेतून ग्रामपंचायतीने वर्षभरापूर्वी एक मोठे ट्रॅक्टर, मोठमोठ्या सहा कचरापेट्या, सेफ्टी टँक स्वच्छ करण्यासाठी टँकर तसेच स्वच्छता अभियानांतर्गत आवश्यक असलेल्या अनेक साहित्यसामग्रीची खरेदी केली आहे. यासाठी कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांची मोठी फौज तैनात करण्यात येत आहे; मात्र फक्त आठवडे बाजार आणि गावातील बाजारपेठेव्यतिरिक्त इतर भागांत स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाला आहे. याबाबत वारंवार लक्ष वेधूनही प्रशासक व ग्रामसेविका फारसे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

---------------
गावात स्वच्छतेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. जे लोक किंवा दुकानदार, मटण विक्रेते स्वच्छतेचे नियम पाळत नसतील त्यांच्यावर नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत.
- प्रशांत जाधव, प्रशासक, बोर्डी ग्रामपंचायत