कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला विरोध

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला विरोध

अंबरनाथ, ता. १७ (बातमीदार) : कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला चिखलोली ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवून निदर्शने केली. जमिनीचे मोजमाप घेण्‍यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना चिखलोली गाव संघर्ष समितीने केलेल्या तीव्र असंतोषाला सामोरे जावे लागले. यामुळे अधिकारी केवळ पंचनामे करून माघारी परतले.
अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील चिखलोली येथील सर्व्हे नंबर ३९ या जागेवर कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सोमवारी १७ एप्रिल रोजी शासकीय कामासाठी जागेचे मोजमाप करण्याचे ठरले होते. यासाठी सरकारी अधिकारी दाखल झाले होते. या जमीन मोजमापाला आगरी युवक सेनेचे युवक अध्यक्ष शरद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली चिखलोली गाव संघर्ष समितीच्या वतीने तीव्र विरोध करण्‍यात आला. संघर्ष समितीचा विरोध होणार असल्याची कुणकुण लागल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्‍यान, शासकीय अधिकारी जागा मोजणी करायला येणार म्हणून गावाच्या वेशीवरच निषेधाचा फलक लावून प्रवेशबंदी करण्यात आली होती.
------------------
भूमिपुत्रांचा इशारा
गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक प्रकल्प राबवण्यासाठी चिखलोलीच्या भूमिपुत्रांची जागा घेण्यात आली. त्यामुळे भूमिपुत्रांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी गायरान आहेत, सरकारी जमिनी नाहीत. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकल्पाला चिखलोलीची जागा दिली जाणार नाही. सरकारने ती मागू नये; अन्यथा अन्यायाविरोधात कायदा हाती घ्यावा लागला तरीही भूमिपुत्र डगमगणार नाहीत, असा इशारा म्हात्रे यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com