
‘एचओजी’मुळे पश्चिम रेल्वेची ३२७ कोटींची बचत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : पश्चिम रेल्वे ‘स्वच्छ रेल-स्वच्छ भारत’ मिशनमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे. ट्रेन ऑपरेशनचा खर्च कमी करण्यासाठी आणि प्रदूषणाला आळा बसण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागाने ‘हेड ऑन जनरेशन’ (एचओजी) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे डिझेल जनरेटरला विजेला पर्याय उपलब्ध झाल्याने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल ३२७ कोटींची बचत केली असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
भारतीय रेल्वे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विद्युतीकरणावर जास्त भर दिला जात आहे. आता तर रेल्वेच्या खर्चात बचत करण्यासाठी ‘एण्ड ऑन जनरेशन’ तंत्रज्ञानाऐवजी ‘हेड ऑन जनरेशन’ (एचओजी) हे तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला जात आहे. या तंत्रज्ञानामुळे जनरेटरपेक्षा रेल्वेच्यावर असणाऱ्या तारांनी रेल्वेला वीज पुरवली जात आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या डब्यातील वातानुकूलित यंत्र, दिवे, पंखे आणि पॅण्ट्री या प्रवासी सुविधा कार्यान्वित केल्या जातात. ‘एचओजी’ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी एलएचबी प्रकारचे कोच सर्वांत योग्य आहे.
आतापर्यंतची सर्वाधिक बचत
पश्चिम रेल्वेने २०२२-२३ मध्ये ३० हजार ११० ट्रेनमधून जनरेटर कार (पॉवर कार) काढून टाकून त्या एचओजी तंत्रज्ञानावर चालवण्यास सुरुवात केली आहे. २०२१-२२ मध्ये २२ हजार ९१४ ट्रेनमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात आली होती. त्याद्वारे १३६ कोटी रुपयांची बचत झाली होती. २०२२-२३ मध्ये एचओजी ऑपरेशन्समुळे आतापर्यंतची सर्वाधिक आर्थिक बचत करण्यात आली आहे.