महामार्गावरील प्रवास लवकरच सुखकर

महामार्गावरील प्रवास लवकरच सुखकर

वसई, ता. १८ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाबद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहनांची वर्दळ व अपघात होत असतात. उद्योगपती सायरस मेस्त्री यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने अनेक उपाययोजना करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच नव्याने १० पादचारी पूल आणि सहा भुयारी मार्ग उभारण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने पावले उचलण्यात सुरुवात केली आहे. यातील पादचारी पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून १८ महिन्यांत या पुलांचे काम पूर्ण केले जाणार आहे.
राष्ट्रीय महामार्गावर चारोटी विभागात २०१८ ते २०२२ या पाच वर्षात ४६१ अपघातांमध्ये ३३५ जणांचा बळी गेला आहे; तर मनोर ते चिंचोटी भागात अडीच वर्षात ४५१ अपघातात ६१५ जखमी तर ९८ जणांचा मृत्यू झाला. अपघाताची संख्या वाढत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनीदेखील जिल्ह्याच्या अखत्यारीत येणाऱ्या पूर्ण महामार्गाचा आढावा घेतला व उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाला सूचनादेखील दिल्या होत्या. एकीकडे भरधाव वेगाने येणारी वाहने, क्षमतेपेक्षा जास्त होणारी मालवाहतूक यामुळे अपघाताची मालिका सुरू आहे. त्यातच पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडताना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १० पादचारी पूल आणि सहा भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
तलासरी, कासा, आच्छाड, मनोर, वसई फाटा, विरार, धानिवरी, सोमटा, वाघोबा खिंड, मेंढवण, बापाणे, चिंचोटी, लोढा धाम, पेल्हार, तुंगारेश्वर फाटा, रॉयल गार्डन, दुर्गा माता मंदिर, एचपी पेट्रोल पंप मार्ग, किनारा ढाबा ते वर्सोवा पूल परिसर या भागात अनेक अपघात होत आहे. या अपघातात अनेकांचे बळी जातात, तसेच अनेकांना अपंगत्वदेखील येते. महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या वाहनांचा मोठा धोका निर्माण होत असतो. त्यामुळे भुयारी मार्ग, पादचारी पुलाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भुयारी मार्गासाठी विक्रमगड, नांदगाव व सातिवली येथील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे; तर अन्य तीन ठिकाणी निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे.

अपघातांवर नियंत्रण
महामार्गावर उभारण्यात येणारे पादचारी पूल हा नागरिकांना दोन्ही दिशेला जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच भुयारी मार्गातून लहान वाहनांना रस्ता ओलांडण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार असल्याने महामार्गावरील रस्त्यांवरची वर्दळ काही प्रमाणात कमी होऊन अपघाताच्या संख्येवर नियंत्रण मिळणार आहे.
-------------------------
भुयारी मार्ग
आच्छाड, विक्रमगड, पांडुरंग वाडी, दिल्ली दरबार हॉटेल, नांदगाव, सातिवली.
-------------------------
पादचारी पूल
दापचरी, पारशी ढाबा, वसई - कोल्ही, सुसूपाडा, दारस ढाबा, अरविनो हॉटेल परिसर, वंगणपाडा, शिवेचापाडा.
------------------
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दहा पादचारी व सहा ठिकाणी भुयारी मार्ग तयार केले जाणार आहेत. यातील तीन भुयारी मार्गाची निविदा पूर्ण झाली आहे. लवकरच याची कार्यवाही करण्यात येईल. याशिवाय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येत आहे.
- मुकुंद अत्तरडे, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com