
फडके उद्यानात दुर्गंधीचे ठाण
खारघर, ता. १८ (बातमीदार) : शहराच्या मध्यभागी असलेल्या सिडकोने उभारलेल्या वासुदेव बळवंत फडके उद्यानात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. असे असतानाही या उद्यानातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून उद्यानात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
खारघर सेक्टर बारा शिल्प चौकशेजारी भूखंड क्रमाक एकमध्ये सिडकोने चोवीस हजार चौरस मीटरवर क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके उद्यान विकसित केले आहे. सुट्टीच्या दिवशी हजारो नागरिक मुलाबाळांसह येथे येतात. तसेच परिसरातील महिलांना सकाळी योगा, व्यायाम करण्यासाठीदेखील हे ठिकाण सोईस्कर असल्याने या उद्यानात नेहमीच नागरिकांचा वावर आहे. अशातच या उद्यानात एकमेव स्वच्छतागृह असल्याने सिडकोकडून या उद्यानातील स्वच्छतागृहाची देखभाल केली जात होती; मात्र गेल्या काही दिवसांपासून स्वच्छतागृहाच्या सफाईकडे दुर्लक्ष होत असून पुरेसा पाणी साठा उपलब्ध नसल्यामुळे स्वच्छता गृहातून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. उद्यानातील या प्रकाराबाबत काही महिलांनी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या चालकाकडे तक्रार केली होती, पण आजतागायत पालिकेचे स्वच्छता अधिकारी, उद्यान अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
---------------------------------
उद्यान विभागाला स्वच्छतागृहाची माहिती दिली आहे. तातडीने दुरुस्ती, स्वच्छता केली जाईल.
- जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर