काँक्रिट रस्त्यापूर्वी गटार, जलवाहिनीची कामे

काँक्रिट रस्त्यापूर्वी गटार, जलवाहिनीची कामे

उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : शहरात भुयारी गटारे, जलवाहिनी प्रकल्पासह एमएमआरडीएकडून काँक्रिटीकरणाची विकासकामे होणार आहेत. या तिन्ही विकासकामांसाठी ६९३ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशा वेळी काँक्रीटच्या रस्त्याची कामे करण्यापूर्वी भुयारी गटारे, पाण्याच्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात यावे, जेणेकरून खोदकामामुळे निधीचा अपव्यय टाळता येईल, असे निर्देश उल्हासनगर पालिका आयुक्त अजिज शेख यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सरकारच्या अमृत योजनेंतर्गत भुयारी गटारांसाठी ४१६ कोटी ६६ लाख रुपये, पाणीपुरवठा योजनेच्या प्रकल्पातील वितरण व्यवस्थेची शिल्लक कामे १२६ कोटी आणि एमएमआरडीएकडून केल्या जाणाऱ्या काँक्रीटच्या रस्त्यांसाठी १५१ कोटी रुपये अशा एकूण ६९३ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे. ही कामे जलदगतीने करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. रस्त्याची कामे केल्यावर आणि त्यानंतर भुयारी गटारे, पाण्याच्या मार्गिकेचे काम केल्यास खोदकामामुळे निधीचा अपव्यय होऊ शकतो. तो टाळण्यासाठी काँक्रीटच्या रस्त्याची कामे करण्यापूर्वी भुयारी गटारे, पाण्याच्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात यावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे आयुक्त अजिज शेख यांनी सांगितले. या वेळी आमदार कुमार आयलानी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, अतिरिक्त आयुक्त डॉ. करुणा जुईकर, जमीर लेंगरेकर, मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, शहर अभियंता प्रशांत सोळंके, पाणीपुरवठा अभियंता परमेश्वर बुडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संदीप जाधव, अश्विनी आहुजा, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

निधीचा अपव्यय टाळण्यासाठी समिती
एमएमआरडीएकडून रस्त्यांची कामे सुरू करताना निधीचा अपव्यय होणार नाही, याकरिता अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com