बदलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा

बदलापूर महामार्गावर वाहनांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : बदलापूर महामार्गावरील वसार गावाजवळील रस्त्याचा भूसंपादनाचा वाद असल्याने येथील एक मार्गिका आठ दिवसांपूर्वी बंद करण्यात आली. नेवाळी नाका दिशेने जाणारी मार्गिका बंद करण्यात आल्याने बदलापूरकडे जाणाऱ्या अरुंद मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. एक मार्गिका बंद केल्यानंतर या ठिकाणी वाहन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने रस्त्यावर रोड स्टॉपर लावले होते, परंतु वाहनांची संख्या एवढी असते, की हे स्टॉपरदेखील तुटून पडले आहेत. वाहनकोंडीने वाहन चालक हैराण झाले असून एका ठराविक अंतराच्या वादामुळे तासन् तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील वसार गावात एमआयडीसीने पाईपलाईन टाकण्यासाठी भूसंपादन केले असून यामध्ये तफावत आढळून आली आहे. हक्काच्या जागेसाठी वसार गावातील स्थानिक शेतकरी लढा देत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून त्यांचा हा लढा सुरू असून प्रशासन त्यात लक्ष घालत नसल्याने शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. पोलिस प्रशासन, एमआयडीसी अधिकारी यांच्याशी चर्चा करत आठ दिवसांपूर्वीच येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या जागेतील बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील नेवाळी नाका मार्गे जाणारी मार्गिका ही बंद केली. तसेच २० दिवसांचा कालावधी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला असून यावर तोडगा न निघाल्यास पूर्ण रस्ता बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या घटनेला आठ दिवस उलटले असून प्रशासनाने अद्याप याची दखल घेतली नसल्याचे शेतकरी सांगतात.
महामार्गावरील एक मार्गिका ही बंद असल्याने दुसऱ्या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे, कल्याण दिशेकडून येणाऱ्या वाहनांना अंबरनाथ, बदलापूरला जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करावा लागतो. तसेच बदलापूर एमआयडीसीकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून या मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असते. वसार गावाजवळ अरुंद मार्गावरून वाहतूक सुरू असून ट्रक, कंटेनर, टॅंकर अशी मोठी वाहने आल्यास मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ३० मीटरचा रस्ता हा बंद करण्यात आला असून त्यापुढे नेवाळी नाका मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर वळण घेताना ही मोठी वाहने अडकत आहेत. त्यामुळे या वाहनांच्या पाठी इतर वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. दुचाकीस्वार आपल्या दुचाकी जागा मिळेल तशा या ठिकाणाहून मार्गक्रमण करत असल्याने त्यांच्यामुळे या कोंडीत भर पडते. या वाहनांच्या कोंडीत रुग्णवाहिका अडकत असल्याने रुग्णांचेदेखील हाल होत आहेत.
.......
रोड स्टॉपरदेखील तुटले
रस्त्यावर वाहनांची कोंडी होऊ नये, अपघात होऊ नये, नियमात वाहतूक व्हावी यासाठी रस्त्याच्या मधोमध रोड स्टॉपर लावले आहेत, परंतु वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हे स्टॉपर तुटून पडले आहेत. स्टॉपर तुटल्याने वाहन चालक जागा मिळेल तशी आपली वाहने चालवत असल्याने कोंडीत भर पडत आहे. अनेकदा गावकरीच या ठिकाणी रस्त्यावर उतरत झालेली वाहनांची कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
....
वसार गावाजवळ रस्त्याची एक बाजू बंद केलेली असल्याने तेथून वाहन काढताना आमची दमछाक होत आहे. रोज कामानिमित्त कल्याणला ये-जा होत असल्याने या मार्गाचा वापर होतो. शेतकऱ्यांच्या जागेचा वाद असेल तर प्रशासनाने त्यावर तोडगा काढावा. कायम सामान्य नागरिकांना वेठीस धरले जाते हे कितपत योग्य आहे?
- अतुल पाटील, चालक
.....
जागेचा वाद असल्याचा फलक या ठिकाणी लागला होता; मात्र त्यावर पुढे काही झाले नसल्याने त्याकडे वाहनचालक लक्ष देत नव्हते. आता रस्ताच बंद करण्यात आल्यानंतर वाहनचालकांना त्रास जाणवू लागला आहे. करदात्या नागरिकांना योग्य सोयी-सुविधा देण्यास प्रशासन कायम अयशस्वी होताना दिसते. शेतकरी व प्रशासनाचा वाद येथे आहे त्याचा फटका मात्र वाहनचालकांना बसत आहे.
- अमित देशपांडे, वाहन चालक
......
बदलापूर पाईपलाईन रोडवर वसार गावाजवळ खड्डा पडला असल्यामुळे एक मार्गिका बंद करण्यात आली आहे. एमआयडीसीला पत्रव्यवहार करत हा रस्ता सुस्थितीत करावा असे कळवण्यात आले आहे, जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल.
- सुधाकर खोत, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com