
जुन्नर हापूसला अवकाळीचा फटका
वाशी, ता. १८ (बातमीदार) ः वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात कोकणातील हापूसचा हंगाम संपताच इतर आंब्याबरोबर जुन्नर हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हा आंबा बाजारात दाखल होतो, पण यंदा पुणे-जुन्नरमधील आंबेगाव भागात गारपीट झाल्याने आंब्याच्या उत्पादनाला फटका बसला आहे.
वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात मेअखेर कोकणातील हापूसचा हंगाम संपताच जूनच्या सुरुवातीलाच जुन्नर हापूस आणि केशर आंबा हंगाम सुरू होतो. जुन्नर येथील हापूस परिपक्व होण्याच्या प्रक्रियेत आहे, परंतु ऐन हंगामात अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाण्यात गेला आहे. पावसामुळे यंदा २५ टक्के आंबे गळून पडल्याने कीड तयार झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून आंब्यासाठी केलेला खर्चदेखील भरून निघण्याची शास्वती नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
---------------------------------------
एपीएमसी बाजारात मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जुन्नर हापूस दाखल होण्यास सुरुवात होते, पण यंदा अवकाळीचा फटका बसला आहे.
- रवींद्र पानसरे, बागायतदार
---------------------------------------
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने आंबे गळती झाली असून २५ टक्के उत्पादनाला फटका बसला आहे. पावसाने यंदा जुन्नर हापूसच्या हंगामाला विलंब होणार आहे.
- संजय पिंपळे, बागायतदार