
अवकाळीमुळे ११ कोटींचे नुकसान
वसई, ता. २४ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीसह फळ बागांना मोठा फटका बसला आहे. बसला डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या पाच तालुक्यात अस्मानी संकटाने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तर दुसरीकडे जिल्हा कृषी विभागाने पंचनामे पूर्ण करून शासनाकडे ११ कोटी ५० लाख ७९ हजार रुपये इतकी नुकसानीची मागणी केली आहे.
पालघर जिल्ह्यात बागायती मोठ्या प्रमाणात आहे. येथील शेतमाल हा मुंबई, ठाणे यासह आजूबाजूच्या परिसरात तसेच राज्याबाहेर देखील निर्यात केला जातो. अनेक कुटूंब शेती बागायतीवर अवलंबून आहेत. या उत्पादनातून मिळणाऱ्या पैशातून खर्च भागवला जातो. परंतु वातावरणात झालेला बदल, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांना लागवडीसाठी केलेला खर्चही वाया गेला आहे. त्यामुळे महागाईत संसाराचा गाढा कसा हाकणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
१९ मार्चपर्यंत झालेल्या अवकाळी पावसात पहिल्या टप्प्यात चार तालुक्यात बागायतीवर परिणाम झाला. कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांतून सात कोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले होते. पण २० मार्च रोजी झालेल्या पावसामुळे डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे नुकसानीचा आकडा हा सातवरून ११ कोटींच्या घरात पोहोचला आहे.
आतापर्यंत अडीच हजार शेतकरी बाधीत
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले. यात दोन हजार ५०० हून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. बाधित क्षेत्र पाहता त्यानुसार ११ कोटीहून अधिक नुकसानीची मागणी करण्यात आली आहे.
भरपाईची प्रतीक्षा
पालघर जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे बागायतीचे नुकसान झाले. यात प्रामुख्याने काजू आणि आंब्याचे प्रचंड नुकसान झाले. तसेच भाजीपाला लागवडीवरही परिणाम झाला. पालघर जिल्हा कृषी विभागाने पंचनामा करून हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
----------------
बाधित क्षेत्र हेक्टर -५२८६. ५८
नुकसान - ११ कोटी ५० लाख ७९ हजार