महापालिकेतील कर्मचाऱ्यांची अखेर पदोन्नती

महापालिकेतील कर्मचाऱ्यांची अखेर पदोन्नती

विरार/ वसई, ता. १९ (बातमीदार) : वसई-विरार महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बढत्या अनेक वर्षांपासून रखडल्या होत्या. त्या बढत्यांना अखेर हिरवा कंदील मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पालिकेतील ११९ लिपिकांना सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिका २००९ मध्ये चार नगरपालिका व ५३ गावांच्या ग्रामपंचायती मिळून बनलेली आहे. या ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या स्थापनेनंतर महापालिकेत समावेश करण्यात आला; मात्र महापालिकेच्या स्थापनेला १३ वर्षे उलटूनही अनेक कर्मचारी बढतीच्या प्रतीक्षेत होते. त्यातील अनेक कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढत सेवानिवृत्त झाले; तर ग्रामपंचायत आणि नगरपालिकांमध्ये कार्यरत असलेले ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी आता निवृत्तीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आजही अनेक लिपिक पदावरून वरिष्ठ लिपिक पदासाठी वाट पाहत बसले होते. पदोन्नती दिलेल्या लिपिकांमध्ये दोन दिव्यांग कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ११७ विविध वर्गातील लिपिकांचा समावेश आहे. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या पदावरून मुख्य आरोग्य निरीक्षक या पदावर एक पदोन्नती देण्यात आली आहे; तर दोन सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिकांची त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्तता झाली आहे.

===============

कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. यामध्ये प्रत्येकाचे गोपनीय अहवाल, सेवाज्येष्ठता अहवाल मागवल्यानंतर हरकती मागवण्यात आल्या होत्या. याची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ११९ लिपिकांना वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे; तर वरिष्ठ लिपिकांना अधीक्षक म्हणून बढती मिळावी, यासाठीच्या सूचना आस्थापना विभागास देण्यात आल्या आहेत.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका

==============
पालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना बढती देण्याबाबत प्रशासनाकडे सातत्याने मागणी करत होतो, त्या मागणीला यश आले आहे. आता प्रशासनाने पालिकेत ठेक्यावर असलेल्या आणि इतक्या वर्षांपासून पालिकेची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पालिकेत समाविष्ट करून घ्यावे.
- नारायण मानकर, माजी महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com