भर उन्हात कोंडीविघ्न

भर उन्हात कोंडीविघ्न

वाशी, ता.२०(बातमीदार)ः ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मुंब्रा बाह्यवळण मार्ग एक एप्रिलपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक सध्या ठाणे-बेलापूर मार्गावरून वळवण्यात आल्याने रबाळे नाका ते दिघा रेल्वे स्थानक परिसरात वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे.
मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या रेतीबंदर पुलाकडील भागात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे नवी मुंबईतील रबाळे, महापे एमआयडीसी क्षेत्रातील प्रवेश मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने वळवण्यात आली आहे. त्याचा परिणाम ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. एमआयडीसी क्षेत्रातील वाहने शहरातील मुख्य रस्त्याबरोबरच दिघा ते पटणी मार्गे दिवा सर्कल भागात वळवल्याने अंतर्गत वाहतूक व्यवस्थेला त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे ऐरोली, रबाळे, दिघा, रामनगर, विटावाकडे जाणाऱ्या स्थानिक वाहन चालकांना वाहतूक कोंडी झाल्यास ताटकळत बसावे लागत आहे. दरम्यान, गुरूवारी (ता.२०) रबाळे ते दिघा मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यावेळी ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
-----------------------------------------------
सात मिनिटांच्या अंतरासाठी पाऊणतास खर्ची
नवी मुंबई शहरात सध्या ४० अंश सेल्सिअसवर तापमान पोहोचले आहे. अशातच एकीकडे उन्हाचा पारा चढलेला असताना घामाच्या धारांमधून वाहन चालकांना वाट शोधावी लागत होती. या कोंडीमुळे रबाळे-ऐरोली ते दिघा रेल्वे स्थानक या सात मिनिटाच्या अंतरासाठी जवळपास पाऊणतास लागत असल्याने उकाड्याने अनेकांचे चांगलेच हाल झाले. त्यामुळे पटणी येथील मैदानात पार्क करून ठेवण्यात आलेली वाहने दिवसाही सोडली जात असल्याने दिवसरात्र या मार्गिकेवर वाहतूक कोंडी होत आहे.
----------------------------------------------------
रस्त्यालगतची वाहने हटवा
ठाणे-बेलापूर मार्गावर रस्त्याच्याकडेला रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर खासगी बसेच व इतर वाहने उभी केली पार्क जातात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची कोंडी होते. त्यातच रस्त्यालगत थाटलेल्या गॅरेज इतर व्यावसायिकांच्या अतिक्रमणांमुळे रस्ते मोठे असतानाही दिघा ते रबाळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा वाहन पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.
------------------------------------------------------
वाहतूक पोलिसांवर ताण
वाहनचालकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्ग बंद असल्याने ऐरोली, दिघा मार्गी अवजड वाहने वळवण्यात येत असल्याने दुपारी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तर या कोंडीचा भार वाहतूक पोलिसांवरही पडत असून भर उन्हात उभे राहून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे लागत आहे.
--------------------------------------------------
मुंब्रा बायपास रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक नवी मुंबई मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळ्यापर्यंत हीच समस्या राहणार असून वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे कोंडीत भर पडत आहे.
-गोपाल कोळी, वाहतूक पोलिस निरीक्षक, रबाळे
---------------------------------------
मागील आठवड्यापासून अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहनांमुळे छोट्या वाहनांना वाहन चालवताना अडचण निर्माण होते आहे. कडक उन्हातच वाहतूककोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-सुभाष काळे, वाहनचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com