अत्याधुनिक सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाद्वारे मिरा-भाईंदरवर नजर

अत्याधुनिक सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाद्वारे मिरा-भाईंदरवर नजर

भाईंदर, ता. २० (बातमीदार) : संपूर्ण मिरा-भाईंदर शहरावर एकाच वेळी आता एक हजाराहून अधिक सीसीटीव्हींच्या माध्यमातून पोलिसांची बारीक नजर असणार आहे. उड्डाणपुलाखाली बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक नियंत्रण कक्षामुळे हे शक्य होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नियंत्रण कक्षाचे येत्या शनिवारी लोकार्पण होणार आहे. सीसीटीव्हींच्या जाळ्यामुळे शहारातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे पोलिसांना शक्य होणार आहे.
संपूर्ण शहरात साडेतीन हजार सीसीटीव्ही बसवण्याचा मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा संकल्प आहे. सध्या यातील बाराशेच्या आसपास विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. महापालिकेने सीसीटीव्हीसाठी १७४ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यात भांडवली खर्च तसेच पाच वर्षांचा नियंत्रण कक्ष चालविण्याचा खर्च समाविष्ट आहे. या सविस्तर प्रकल्प अहवालाला गृह विभागाची मान्यतादेखील प्राप्त झाली आहे. हा निधी अद्याप महापालिकेला मिळालेला नाही. मात्र महापालिकेच्या स्वत:चा निधी, नगरसेवक निधी आदीतून सध्या बाराशेच्या आसपास सीसीटीव्ही बसवले आहेत. हे सीसीटीव्ही शहरातील सर्व प्रमुख रस्ते, नाके, शहराची प्रवेशद्वारे, शहरातील अंतर्गत रस्ते आदी ठिकाणी बसविण्यात आले आहेत.
शहरात बसवण्यात आलेले हे सीसीटीव्ही सहा पोलिस ठाण्याशी जोडण्यात आले आहेत. आता ही सर्व सहा पोलिस ठाणे महापालिकेने उभारलेल्या अद्ययावत अशा नियंत्रण कक्षाशी ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आली आहेत. त्यामुळे एकाच नियंत्रण कक्षाद्वारे संपूर्ण शहरावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. हा नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी महापालिकेला साडेसहा कोटी रुपये खर्च आला असून सविस्तर प्रकल्प अहवालात दाखविण्यात आल्याप्रमाणे या नियंत्रण कक्षाची रचना करण्यात आली आहे.
.....
असा आहे नियंत्रण कक्ष
नियंत्रण कक्षात एक व्हिडीओ वॉल आहे. ज्यावर असलेले मॉनिटर संपूर्ण शहरातील विविध भागांचे दृश्य दाखवणार आहेत. याशिवाय या कक्षात पाच टर्मिनल कक्षदेखील आहेत. या कक्षात पोलिस अधिकाऱ्‍यांना एखाद्या विशिष्ट विभागावर लक्ष ठेवायचे असल्यास त्याच भागाची लिंक घेऊन त्या भागावर लक्ष केंद्रित करता येणार आहे. याशिवाय ५० ते ६० दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज ठेवता येणारा सर्व्हर कक्ष, जनरेटर संच, यूपीएस कक्ष आदी सुविधा या नियंत्रण कक्षात आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर नियंत्रण कक्ष मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांकडे हस्तांतर केला जाणार आहे. कक्षाची देखभाल दुरुस्ती मात्र महापालिकेकडूनच केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com