
१२.५७ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुबई, ता. २० : पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात १२ लाख ५७ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत तब्बल ७९.४८ कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. मुंबई विभागाची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. एसी लोकलमध्येही विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी लोकल सेवा, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली जाते. एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान विनातिकीट/अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण १२.५६ लाख प्रकरणे आढळून आली. त्यातून ७९.४८ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे बोर्डाने २०२२-२३ साठी ७४.७३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यापेक्षाही ६.३५ टक्क्यांनी अधिक दंड वसूल केला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
एसी लोकलमध्येही फुकटे प्रवासी
नुकताच १५ एप्रिल २०२३ रोजी वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (मुंबई विभाग) यांच्या देखरेखीखाली एसी लोकलमध्ये अचानक तिकीट-तपासणी मोहीम राबवण्यात आली. चर्चगेट ते विरारदरम्यान चार वेगवेगळ्या एसी लोकलमध्ये सरप्राईज चेकिंग करण्यात आले. विनातिकीट प्रवासाची ६१ प्रकरणे आढळून आली. प्रवाशांकडून ३२ हजार ४२५ रुपये दंड वसूल केला गेला. १७ एप्रिल २०२३ पर्यंत एसी लोकलमधील अनियमित प्रवासाची ३ हजार ३०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.