
पत्नीची हत्या करणारा अटकेत
सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. २१ ः पत्नीची हत्या करून फरारी झालेल्या आरोपीला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. अवघ्या चोवीस तासांत आरोपीला पकडण्यात यश आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
जयश्री भोसले या महिलेची तीन दिवसांपूर्वी बदलापूर येथील राऊत आर्केड येथे चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी महिलेचा पती गणेश भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गणेश हा गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथून नागरकोईल एक्स्प्रेसने कल्याण रेल्वेस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार
अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहायक पोलिस आयुक्त नीलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक संदीप खाडे, हवालदार गणेश गावडे, सुनील सूर्यवंशी, शेखर भावेकर, ज्ञानेश्वर महाजन, चंद्रकांत सावंत, पोलिस शिपाई राजेंद्र थोरवे, अर्जुन मुल्तलगिरी, मिलिंद मोरे, रेवननाथ रोकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. नागरकोईल एक्स्प्रेसच्या पहिल्या डब्यापासून शेवटच्या डब्यापर्यंत सापळा रचन्यात आला होता. गणेश एक्स्प्रेसमधून खाली उतरताच त्याला ताब्यात घेण्यात आले. अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नी आपल्यावर खोटा गुन्हा नोंदवण्याच्या विचारात होती. त्यामुळे तिची हत्या केल्याचे आरोपीने सांगितले.