शहापुरात दोन अर्ज वैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरात दोन अर्ज वैध
शहापुरात दोन अर्ज वैध

शहापुरात दोन अर्ज वैध

sakal_logo
By

शहापूर, ता. २२ (बातमीदार) : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आलेल्या अर्जाच्या छाननीमध्ये अवैध ठरल्यानंतर अपिलात गेलेल्या १३ उमेदवारांपैकी दोन अर्ज वैध ठरले आहेत. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांची निवडणूक होणार आहे. शिंदे गटाचे समीर बागराव यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक सापळे यांच्यात लढत होणार आहे. त्यामळे बाजार समितीच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे.

अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी (ता. २१) दोन वैध उमेदवारांसह ८२ उमेदवारांपैकी ३७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून त्यामध्ये एक जागा बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता १७ जागांच्या लढतीसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत १८ जागांसाठी तब्बल १०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेमध्ये विविध कारणांनी तब्बल २५ अर्ज बाद झाल्याने ८० उमेदवार रिंगणात होते. बाद झालेल्या २५ उमेदवारांपैकी १३ उमेदवार अपिलात गेले होते. अपिलात धाव घेतलेल्या १३ बाद उमेदवारांपैकी ग्रामपंचायतीच्या आर्थिक दुर्बल घटकातील विनायक सापळे व कृषि पत संस्थेच्या इतर मागासवर्गीयमधील सुरेश वाळिंबे असे दोन अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या जागेसाठी शिंदे गटाचे समीर बागराव यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे विनायक सापळे अशी सरळ व तुल्यबळ लढत होणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी ३७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून एक जागा बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता बाजार समितीच्या १७ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात आहेत.