
घणसोलीत पदपथावर थाटले हॉटेल
घणसोली, ता. २२ (बातमीदार) ः घणसोली सेक्टर १० मध्ये सिडकोच्या वतीने बांधण्यात आलेल्या गृहसंकुलाच्या बाहेरील पदपथाला फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे. या ठिकाणी टेबल-खुर्च्या मांडून उघड्यावरच हॉटेल सुरू करण्यात आले आहे. यामुळे पादचाऱ्यांना त्रास होतो आहे. पालिका यावर कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पदपथावर होणारे अतिक्रमण घणसोली विभागात काही नवीन नाही. भाजीविक्रेते तसेच इतर व्यापारी पदपथावर अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटतात. याकडे महापालिका वारंवार डोळेझाक करत असल्याचे पाहायला मिळते, असा आरोप नागरिकांनी केला आहे. महापालिकेची अतिक्रमण विभागाची गाडी दिसल्यावर फेरीवाले आपले समान आवरून ठेवतात आणि गाडी पुढे गेली की जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. या फेरीवाल्यांवर पालिका कायमची कारवाई का करत नाही असा सवाल, नवी मुंबईकर करत आहेत. घणसोली सेक्टर १० या ठिकाणी पदपथावर सर्वत्र फेरीवाल्यांनी आपला संसार थाटला आहे. या ठिकाणी टेबल-खुर्च्या टाकून हॉटेलही थाटल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दपथावरून ये-जा करण्यासाठी उरलेली किंचितशी जागाही फेरीवाल्यांनी व्यापून टाकल्याचे दिसत आहे. त्यामुळे पादचारी त्रासले आहेत. या ठिकाणी रस्त्यावरून चालायचे म्हटले तरी रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या असंख्य गाड्या उभ्या असतात. यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.