खारघरमधील बच्चे कंपनीचा हिरमोड

खारघरमधील बच्चे कंपनीचा हिरमोड

खारघर, ता. २३ (बातमीदार) : शाळेला सुटी पडल्यामुळे मुले खेळण्यासाठी उद्यान आणि मैदानाकडे धाव घेत आहे. मात्र, या उद्यानांतील झोपळ्यांवरील झोकेच गायब झाले आहेत. तर अनेक ठिकाणी खेळण्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. मैदानातही खडी, मातीचे ढिगारे असल्याने मुलांना मैदानी खेळ खेळण्यास अडचणी येत आहेत. अशा असुविधांमुळे उन्हाळी सुटीत विरंगुळा म्हणून उद्यान, मैदानात येणाऱ्या नागरिकांसह बच्चे कंपनीचा मात्र हिरमोड होत आहे
एकविसाव्या शतकातील आधुनिक आणि शैक्षणिक शहर म्हणून खारघर शहराची ओळख आहे. शहरात सिडकोने सेक्टरनिहाय उद्यान आणि मैदान उपलब्ध करून दिले आहे. हे उद्यान आणि मैदाने पनवेल पालिका अस्तित्वात आल्यानंतर सिडकोने पालिकेकडे हस्तांतरण केले. पालिकेकडून खारघरमधील बहुतांश उद्यान आणि मैदानात विकासकामे सुरू असल्यामुळे मातीचे ढिगारे, दगड, खडी मैदानात पडून आहे. सेक्टर २० शिल्प चौक, शेजारील सेक्टर २१ भूखंडावरील उद्यानातील कामे जवळपास सहा महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. उद्यानातील खेळणी, घसरगुंडी, झोपाळा आदी मोडकळीस आली आहेत. मुले खेळताना इजा होईल, अशी भीती नागरिकांना वाटत आहे.
सेक्टर २ मध्ये एकमेव आणि शांतीमय मैदान म्हणून ओळखले जाते. परिसरातील मुले मैदानात खेळत असतात. सकाळ, संध्याकाळ लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची रेलचेल असते; मात्र या मैदानात पालिकेकडून विकासकामे करताना खेळणी काढून टाकण्यात आली आहे. मैदानात असलेले मातीचे ढिगारे आणि दिवसा तरुणाईंचे अश्लील चाळे सुरू असल्याने मुले आणि पालकांनी मैदानाकडे पाठ फिरवली आहे. अशीच अवस्था इतर सेक्टरमध्ये आहे. मुलांना सुटीत खेळण्यासाठी पुरेसे मैदान आणि उद्यान मिळत नसल्याने नाराजी पसरली आहे.

सचिन तेंडुलकर उद्यानाची दुरवस्था
सिडकोने सेक्टर २१ सचिन तेंडुलकर मैदानालगत आणि वसाहतीलगत उद्यान असल्यामुळे मुले आणि महिलांची संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. उद्यानातील हिरवळ गायब झाली आहे. व्यायाम करण्यासाठी बसवलेले साहित्य आणि लहान मुलांचा झोपाळा तुटून पडला आहे. घसरगुंडीलगत मोठमोठे खड्डे पडले आहे. घोडा गाडी निखळल्याने मुलांना खेळता येत नाही. उद्यानात उभारलेल्या अर्धवट अवस्थेत व्यासपीठाच्या खोलीत प्रेमीयुगुलांचे चाळे सुरू असतात. काही मुले-मुली उद्यानात धुम्रपान करत असतात. उद्यान असूनही उपयोग नाही. मुलांना खेळायचे कुठे? असा प्रश्न परिसरातील रहिवासीयांना पडला आहे. उद्यानाला लागून खेळण्यासाठी एकमेव मैदान होते; मात्र तेथे कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारणीचे काम सहा महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे खेळताना अडचण होत असल्याचे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी सांगितले.

शिल्प चौकालगत असलेल्या उद्यानाच्या चारी बाजूने रस्ते आणि नागरिकांची वर्दळ असते. त्यात मुलांना सुटी असल्यामुळे महिला मुलांना खेळण्यासाठी घेवून येतात. मात्र, उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. बाजूलाच माती, रेती आणि खडीचे ढिगारे पडून आहे. त्यामुळे मुले खेळताना पडून जखमी होईल अशी भीती वाटते.
- आकांशा गणगे, गृहिणी

खारघर परिसरात सत्ताधाऱ्यांकडून चुकीचे काम सुरू आहे. जनतेच्या पैशांची नासाडी होत आहे. आज खारघरमधील काही उद्याने आणि मैदानातील खेळणी तुटून पडल्या आहेत. उद्यान आणि मैदानात सहा महिन्यांपासून विकासकामे सुरू आहेत. मुलांना उन्हाळी सुटीतही खेळता येत नाही. जिथे गरज आहे, तिथे काम केले जात नाही.
- मधू पाटील, पदाधिकारी, खारघर कॉलनी फोरम

खारघरमधील काही उद्याने आणि मैदानांमध्ये विकासकामे सुरू आहे. येत्या दोन दिवसांत उद्यानाची पाहणी करून मुलांना खेळता येईल, याची दक्षता घेतली जाईल.
- राजेश कर्डीले, उद्यान अधिकारी, पनवेल महापालिका

ऑनलाईन तक्रार सुविधा हवी!
पनवेल पालिका प्रशासनाने नागरिकांना मालमत्ताकरांची भरणा करावी, यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे वसाहतीमधील जनतेशी निगडित समस्यासाठी पालिकेने संकेतस्थळ उपलब्ध करून दिल्यास नागरिक ऑनलाईन तक्रार करू शकतो. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी खारघरवासीयांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com