कचरा प्रक्रियेसाठी जपानी तंत्रज्ञान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरा प्रक्रियेसाठी जपानी तंत्रज्ञान
कचरा प्रक्रियेसाठी जपानी तंत्रज्ञान

कचरा प्रक्रियेसाठी जपानी तंत्रज्ञान

sakal_logo
By

भाईंदर, ता. २३ (बातमीदार) : दररोज निर्माण होणाऱ्‍या कचऱ्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी जपानी तंत्रज्ञान उपयोगात आणण्याचा प्रस्ताव आहे. आमदार गीता जैन यांनी नुकताच जपान दौरा केल्यानंतर त्या ठिकाणच्या तंत्रज्ञानावर आधारित मिरा-भाईंदरसह वसई-विरार शहरासाठी संयुक्तपणे कचरा प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
विधिमंडळ सदस्यांनी नुकताच जपानचा दौरा केला. या दौऱ्‍यात मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैनदेखील सहभागी झाल्या होत्या. या दौऱ्‍यात जपानमधील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी कचरा प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान मिरा-भाईंदर व वसई-विरार या शहरात निर्माण होणाऱ्‍या कचऱ्‍यावर संयुक्तपणे प्रक्रिया करण्यासाठी वापरल्यास त्याचा दोन्ही शहरांना मोठा फायदा होईल, असे मत जैन यांनी व्यक्त केले आहे.
उत्तन येथील धावगीच्या डोंगरावर महापालिकेचा कचरा प्रकल्प सुरू आहे. तसेच मोकळ्या जागेवर सुमारे दहा लाख मेट्रिक टन इतका कचरा साठून राहिला आहे. वर्गीकरण झालेल्या कचऱ्यावर प्रकल्पात प्रक्रिया होऊन त्यापासून खतनिर्मिती तसेच जळाऊ इंधन तयार केले जाते. मात्र या ठिकाणच्या कचऱ्‍यातून दूर्गंधी येत असल्याचा आक्षेप स्थानिकांचा आहे. त्यामुळे कचरा प्रक्रियेसाठी जपानी तंत्रज्ञान वापरले, तर ते अधिक यशस्वी होईल. मिरा-भाईंदरसह वसई-विरार यांच्या संयुक्त प्रकल्पासाठी जागा तसेच सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या निधीची उभारणी यावर संबंधितांशी तसेच राज्य सरकारशी चर्चा करण्यात येणार आहे, असेही जैन यांनी सांगितले.


असे आहे जपानी तंत्रज्ञान
जपानमध्ये अत्यंत अत्याधुनिक पद्धतीने कचऱ्‍यावर प्रक्रिया केली जाते. त्यासाठी भारतीय चलनानुसार एकंदर तीन हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प संपूर्णपणे स्वयंचलित असून मनुष्यबळाचा कमीत कमी वापर केला जातो. प्रकल्पात अतिशय स्वच्छता बाळगली जाते. दररोज गोळा होणारा कचरा बंदिस्त गाड्यातून प्रकल्पात आणला जातो. तो स्वयंचलित पद्धतीनेचे प्रकल्पात रिकामा केला जातो. रिकाम्या झालेल्या गाड्या पूर्णपणे स्वच्छ करूनच प्रकल्पातून बाहेर पडतात. आलेला कचऱ्याचे वर्गीकरण करून धातू, प्लास्टिक, लाकूड आदीवर स्वतंत्रपणे करून त्याचा पुनर्वापर केला जातो; तर उर्वरित कचरा इन्सिनरेटरमध्ये जाळून टाकला जातो. विशेष म्हणजे कचरा जाळताना कोणत्याही प्रकारचा धूर निर्माण होत नाही. त्यामुळे प्रदूषण होत नाही, अशी माहिती आमदार गीता जैन यांनी दिली.


कचरावर्गीकरणामुळे साशंकता
जपान येथे कचऱ्‍याचे शंभर टक्के वर्गीकरण होत असल्यामुळे त्या ठिकाणी प्रकल्प यशस्वी ठरला आहे; पण मिरा-भाईंदरमध्ये अवघ्या पन्नास ते साठ टक्के कचऱ्‍याचे वर्गीकरण होत आहे. त्याबाबत नागरिकांच्या पातळीवर अद्याप उदासीनताच आहे. शिवाय मिरा भाईंदर व वसई विरार या दोन्ही शहरांच्या संयुक्त प्रकल्पाचा प्रस्ताव याआधीदेखील पुढे आला होता; मात्र त्याबाबत पुढे कोणतीही प्रगती झाली नाही. त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांवर जपानी तंत्रज्ञानावर आधारित कचरा प्रकप कितपत यशस्वी होईल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.