ठाणे शहर कोंडी, खड्डेमुक्त करा

ठाणे शहर कोंडी, खड्डेमुक्त करा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलिस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आयोजित बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलिस आयुक्त जयजित सिंह, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. हा रस्ता कुणाच्या मालकीचा आहे याचा विचार न करता त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात सध्या अनेक ठिकाणी विकासकामे सुरू असून त्याचा मोठा ताण ठाणे शहरावर पडला आहे. परिणामी जागोजागी वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे बहुतांश कामे ही १ जूनपूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना आतापासूनच हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. भिवंडी-कशेळी मार्गावरील एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेले काम ६० टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, असे निर्देश या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

----------------------
कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
भिवंडी शहरातील जे खराब रस्त्यांची डागडुजी तात्काळ एमएमआरडीएच्या माध्यमातून करून घ्यावी. साकेत-खारेगाव पुलावर होणारी कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून मुंबई-नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याचे कामदेखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावेत. गरज वाटल्यास रात्रंदिवस काम करून अतिरिक्त मनुष्यबळ वापरण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या. ठाणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीदरम्यान अनेकदा काल्हेर ते आर. सी. पाटील दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या पाईपलाईन रोडचा वापर केला जातो ह्या पाईपलाईन रोडची डागडुजी ताबडतोब करून तो सुस्थितीत आणण्याच्या सूचना या वेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

..................
वाहनांवर कारवाई करा
ठाणे महानगरपालिकेच्या आखत्यारितील घोडबंदर मार्गावरील गायमुख- वाघबीळ मार्गावरील साईड पट्ट्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले असून ते वेळेत पूर्ण करावे. तसेच घोडबंदर रोड आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोड आणि महामार्ग दोन्ही वापरात आणावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सर्व्हिस रोडचा पार्किंगसाठी होणारा वापर थांबवून वाहनांवर कारवाई करावी तसेच. बस, ट्रक आणि स्कूल बसच्या पार्किंगसाठी खारेगाव टोलनाका तसेच पूर्व द्रुतगती मामार्गालगतचे जकात नाक्यांच्या मोकळ्या जागांचा वापर करावा असे निर्देश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com