
रामशेठ ठाकूर महाविद्यालय नॅक पुनर्मूल्यांकनासाठी सज्ज
मोखाडा, ता. २४ (बातमीदार) : मोखाड्यात प्रतिकुल परिस्थितीवर मात करत भव्य दिव्य इमारतीमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची घोडदौड झाली आहे. या महाविद्यालयात शैक्षणिक सुविधांबरोबरच विविध उपक्रम राबवले जात आहेत. आता हे महाविद्यालय राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक) यांच्या द्वितीय पुनर्मुल्यांकनासाठी सज्ज झाले आहे. २६ व २७ एप्रिल रोजी महाविद्यालयाला नॅक समिती भेट देणार आहे. संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय, भव्य मीटिंग हॉल नवीन इमारतीमध्ये तयार करण्यात आला आहे. विज्ञान विभागासाठी स्वतंत्र पाच प्रयोगशाळा, वेगवेगळ्या विभाग प्रमुखांसाठी दहा केबिन, ग्रंथालयाचे संपूर्ण नूतनीकरण, स्वतंत्र रीडींग हॉल, स्वतंत्र नेट व रिसर्च सेंटर तयार करण्यात आले आहे.