ऐन हंगामात हापूसची आवक कमीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन हंगामात हापूसची आवक कमीच
ऐन हंगामात हापूसची आवक कमीच

ऐन हंगामात हापूसची आवक कमीच

sakal_logo
By

तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : लहरी हवामानाचा कोकणातील अस्सल हापूसला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ऐन हंगामात हापूसची आवक कमी होत आहे, तर इतर ठिकाणच्या आंब्यांची आवक वाढली आहे. यंदा आतापर्यंत कोकणातून हापूसच्या केवळ वीस हजार पेट्यांची आवक झाली आहे. हापूसच्या नावे इतर रायवळ, कर्नाटकी आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे.
आपल्या अप्रतिम चवीमुळे कोकणातील हापूस विशेष लोकप्रिय असून त्‍याला इतर आंब्‍यांच्या तुलनेत दरही चांगला मिळतो. मात्र या वर्षी अस्सल हापूस बाजारात कमी आहे. त्यामुळे विक्रेत्‍यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्‍यता आहे. यावर उपाय म्‍हणून अनेकांकडून रायवळ, कर्नाटक आंबा हापूसच्या नावे विकला जात आहे. असे प्रकार होऊ नयेत म्हणून बाजार समितीने व्यापाऱ्यांना सुरुवातीलाच सक्त ताकीद दिली आहे, मात्र तरीही कर्नाटकी आंब्यात आणि कोकणातील हापूस आंब्यात फरक करता येत नसल्याने, ग्राहकांची फसवणूक सहजपणे होते.
दोन-तीन डझनाचे कर्नाटकी आंब्‍याचे बॉक्‍स हापूस या नावाने पॅक करून सर्रास विक्री सुरू आहे. हवामान बदलाचा यंदा कोकणातील हापूसला मोठा फटका बसला. आधी मोहोर करपला, त्‍यानंतर पुन्हा झालेल्‍या अवकाळीने फळगळती झाली. त्‍यामुळे यंदा हापूसचे उत्‍पादनावर मोठा परिणाम झाला आहे. ज्‍या झाडांची फळे टिकली तीही डागाळण्याने त्‍यांना हवा तसा भाव मिळणे कठीण असल्‍याने बागायतदार चिंतेत आहेत.

कर्नाटकी आंब्‍याच्या ७० ते ८० हजार पेट्या
कर्नाटक राज्‍यातील धारवाड, बंगळूरमधून दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंबा मुंबईतील बाजारपेठेत दाखल होतो. कोकणातील आंब्याचे झालेले नुकसान पाहता, कर्नाटकी आंबा बागायतदारांनी यंदा मुबलक आंबा मुंबई बाजारात वळवला आहे. त्‍यामुळे त्‍याचे दरही आवाक्‍यात आहेत. जवळपास ७० ते ८० हजार पेट्यांची आवक यंदा झाल्‍याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पूर्वी कर्नाटकी आंबा कॅरेटमध्ये यायचा, मात्र आता त्‍याच्या पेट्या बाजारात येवू लागल्या आहेत, आणि किलोऐवजी डझनावारी त्‍याची विक्री होत आहे.

अस्‍सल हापूस आतून केशरी
कर्नाटकी आंबा दिसायला कोकणातील हापूस सारखा असला तरी चवीला काहीसा आंबट असतो. कोकणातील हापूसचा रसरशीत गोडवा त्‍याला नसतो. हापूस आंब्याचा रंग आतून केशरी असतो तर कर्नाटकी आंबा पिवळसर असतो. केवळ नफा मिळवण्यासाठी काही विक्रते ग्राहकांची फसवणूक करीत असल्‍याचे एका हापूर विक्रेत्‍याने सांगितले.

................

ग्राहकांना आवाक्‍यातील हापूसची प्रतीक्षा
वाशी, ता. २४ (बातमीदार) ः नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात शनिवारी महाराष्ट्रातून पंधरा हजार आंब्याच्या पेट्या तर इतर राज्यातून पन्नास हजारआंब्याच्या पेट्या दाखल झाल्या. यंदा आंब्याची आवक कमी झाल्‍याने हापूसच्या पेटीला २,००० ते ४,५०० पेटी इतका भाव मिळाल्‍याची माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली. एपीएमसीतील फळ बाजारात कोकणातून हापूसला ग्राहकांकडून मागणी आहे, मात्र आवक खूपच कमी असल्‍याचे व्यापारी सांगतात.