यात्रा संपताच कचऱ्याचा प्रश्न गंभीर

यात्रा संपताच कचऱ्याचा प्रश्न गंभीर

कासा, ता. २४ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी येथे पंधरा दिवसांपासून भरलेली यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. यात्राकाळात जवळपास अडीच ते तीन हजार दुकानदार, विक्रेत्यांनी विविध वस्तू, खाद्यपदार्थ, शीतपेयांची दुकाने थाटली होती. या पंधरा दिवसांत सोळा ते सतरा लाख भाविकांनी हजेरी लावली. कोट्यवधीची उलाढालही झाली; पण यात्रा संपताच महालक्ष्मी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायत विव्हलवेढे यांनी यात्रा काळात अनेक सफाई कामगार नेमले होते. गाड्यांच्या साहायाने मोठ्या प्रमाणात कचरा उचलला जात होता. यात हजारो चिकन, मटन दुकादार, मासे विक्रि करणारे, भाजी, कडधान्य, हॉटेल, कटलरीवाले, हार-फुले विक्रेते तसेच दररोज लाखोंच्या संख्येने येणारे भाविक यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात सांडपाणी, कचरा निर्माण होत होता. आता यात्रा संपली असून अजूनही मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कागद, भाजीपाला, हॉटेलमधील खरकटे व नासलेले अन्न, सांडपाणी यांची दुर्गंधी पसरून रोगराईचा धोका वाढत आहे. त्यात महालक्ष्मी ट्रस्ट व ग्रामपंचायतीची डम्पिंग व्यवस्था नसल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे खूप त्रास दायक होत आहे.

-----------------
तात्पुरत्या डम्पिंगचा आधार
सध्या तात्पुरत्या डम्पिंगचा वापर करून हा कचरा विल्हेवाट लावण्यात येत आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी सांगितले. विव्हळवेढे ग्रामपंचायतीसाठी कायमस्वरूपी डम्पिंग अथवा सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यासाठी नियोजन सुरू आहे. यासाठी पंचायत समिती व वनविभाग यांच्याकडे जागेची मागणीसुद्धा केली आहे, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

-----------------
रोगराईची भीती
सध्या महामार्गाशेजारीच काही कचरा टाकण्यात येत असून अनेक दुकानदार, महामार्गावरील वाहनचालक आपला कचरा येथेच टाकत आहेत. यात्रेत मुख्यतः कोंबड्या, हजारो बकरे कापले जातात. मासे विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात होते. यामुळे नंतर होणारी दुर्गंधी यामुळे रोगराई वाढू शकते. यासाठी यात्रा संपल्यावर आणखी चार-आठ दिवस साफसफाई करावी लागत आहे. कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, कोंबडीची पिसे, थंड पेयांच्या बाटल्या, मद्याचे कॅन, उसाचे, ताडगोळ्याचे टाकाऊ भाग, भाजीपाला, मासे, चिकन-मटन, शिळे अन्न अस्ताव्यस्त पडल्याने यावर माश्‍या बसून दुर्गंधी पसरून साथीच्या रोगांना आमंत्रण मिळू शकते.

-----------------
महालक्ष्मी यात्रा संपली असून लागलीच आणखी काही साफसफाई कर्मचारी नेमून सर्व परिसर स्वच्छ केला जाणार आहे. त्याचबरोबर जंतूनाशकची फवारणी करून साथीचे रोग पसरणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. विहीर, बोरिंग यांचीदेखील काळजी घेतली जाणार आहे. कायमस्वरूपी सांडपाणी व कचरा व्यवस्थापन येथे असावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- एस. दांडेकर, ग्रामविकास अधिकारी, विव्हलवेढे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com