मनसेकडून ठाकरे गटाच्या कार्यालयाची तोडफोड

मनसेकडून ठाकरे गटाच्या कार्यालयाची तोडफोड

नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : येथील शिवसेनेच्या (ठाकरे) जिल्हा सचिवाच्या कार्यालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्याविरोधात शिवसेना नेत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मनेसने केला आहे. याप्रकरणी मनसेचे वसई शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह १० ते १५ जणांवर कार्यालयात जबरदस्ती घुसणे, तोडफोड, महिलेचा विनयभंग, धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अद्याप कुणालाही अटक केली नाही.


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सचिव अनिल चव्हाण, महिला संघटक नम्रता वैती यांनी दोन दिवसांपूर्वी पाणीटंचाईसंदर्भात वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समितीवर मोर्चा काढला होता. या वेळी प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बोलताना अनधिकृत बांधकामावरून अविनाश जाधव यांच्याबाबत अनिल चव्हाण यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याबाबतची एक चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसृत झाली होती. यावरून मनसे वसई शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अनिल चव्हाण यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. या वेळी अनेकांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी प्रवीण भोईर, रवी पाटकर, अमित पटेल, पंकज सावंत यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
---
आमच्या नेत्याबद्दल तथ्यहिन आरोप करत होते. आम्हाला त्यांनी चर्चेसाठी बोलावले. चर्चा सुरू असताना समोरूनच शाब्दिक वाद त्यांनी वाढवला. आम्ही कोणत्याही महिलेला धक्काबुक्की, शिवीगाळ केली नाही किंवा कार्यालयाची तोडफोड केली नाही.
- प्रवीण भोईर, शहराध्यक्ष, मनसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com