गतिरोधकांमुळेच अपघातांची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गतिरोधकांमुळेच अपघातांची शक्यता
गतिरोधकांमुळेच अपघातांची शक्यता

गतिरोधकांमुळेच अपघातांची शक्यता

sakal_logo
By

श्रीवर्धन, ता. २५ (बातमीदार) : तालुक्यात रस्त्यांचे डांबरीकरण होत असून ठिकठिकाणी गतिरोधकही बसवण्यात आले आहे. या सर्व गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. स्थानिक वाहनचालक व पर्यटकांना अंदाज येत नसल्याने गतिरोधकावरून वाहने आपटण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पर्यटनस्थळे असलेल्या श्रीवर्धन तालुक्यात सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक येत आहेत; शिवाय वीकेंडला वाहनांची वर्दळ असते. मुंबई-पुण्यावरून येणाऱ्या चालकांना येथील रस्त्यांचा अंदाज नसतो. त्यामुळे कसेही वाहने चालवतात. अशातच शिस्ते, वडवली, कापोली व दिवेआगर गावाच्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गतिरोधक बसवले गेले आहेत. मात्र, या गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहनचालकांना त्याचा पटकन अंदाज येत नाही. यामुळे अपघाताच्या घटना घडतात. कापोली येथे डांबरीकरण झालेल्या रस्त्याच्या एका बाजूवर काही गतिरोधक आहे. तर दुसऱ्या बाजूला गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट धावतात. प्रत्यक्षात कंत्राटदाराचे काम पूर्ण झाल्याचे दिसत असले, तरी सार्वजनिक बांधकाम खाते अद्याप काम पूर्ण नसल्याचा दावा करत आहे.

बोर्लीपंचतन भागात नागरिकांच्या मागणीनुसार काही ठिकाणी गतिरोधक बसवण्याचे काम बाकी आहे. कंत्राटदाराचे अजून काम बाकी आहे; मात्र सर्व ठिकाणी पांढरे पट्टे व आवश्यक ठिकाणी गतिरोधक लवकरच बसवू.
- तुषार लुंगे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, श्रीवर्धन

कापोली भागात रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहने सुसाट असतात. त्यामुळे सुस्थितीतील व पटकन लक्षात येतील, असे गतिरोधक असावे.
- प्रमोद नाक्ती, व्यावसायिक