हजारों लिटर्स पाणी वाया

हजारों लिटर्स पाणी वाया

बोरिवलीत हजारो लिटर पाणी वाया
टँकरबाबत पालिकेची ठोस उपाययोजना नसल्याचा फटका

कांदिवली, ता. २५ (बातमीदार) ः बोरिवली पश्चिमेतील न्यू लिंक रोडवर पालिकेचा फिलिंग पॉइंट आहे. तिथे गरजेनुसार टँकरची मागणी करणाऱ्या नागरिकांना पाणी दिले जाते. अजूनही काही मोठ्या सोसायट्यांमध्ये पाणी योग्य प्रमाणात मिळत नाही. मात्र, टँकर काठोकाठ भरताना मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पालिकेचे अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बोरिवली न्यू लिंक रोडवर आर/मध्य विभागात जलकामे विभागाचा फिलिंग पॉइंट आहे. आपत्कालीन परिस्थितीत गरज असताना नागरिकांच्या मागणीनुसार तिथे पाणी दिले जाते. पाण्याचा दाब पुरेसा असल्याने जवळपास सात ते आठ मिनिटांत दहा हजार लिटर क्षमतेचा एक टँकर भरला जातो. तिथे काठोकाठ टँकर भरला जातो. टँकर भरून झाल्यावर कॉक बंद करीपर्यंत साधारण अर्धा ते एक मिनिट पाणी वाया जाते. सकाळी ११.३० ते दुपारी १.२० दरम्यान फिलिंग पॉईंटवर पाणी देण्यात येते. सद्यस्थितीत दिवसाला जवळपास १४ टँकर भरले जातात. प्रत्येक टँकरमागे ३० ते ४० सेकंद पाणी वाया गेल्यास दिवसाला जवळपास सहा ते सात मिनिटे म्हणजेच आठ ते नऊ हजार लिटर पाणी वाया जाते. ‘पाणी वाचवा... पाणी हेच भविष्य आहे,’ अशी जनजागृती करणाऱ्या पालिकेकडूनच योग्य उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. पालिकेकडूनच पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पालिकेचे काम सुरू असताना अत्यल्प पुरवठा होत होता तेव्हा नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजले. मात्र, पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षापणामुळे हजारो लिटर पाणी वाया जाते आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल.
- बाळासाहेब कसार, सामाजिक कार्यकर्ते

पाण्याची नासाडी होणे योग्य नाही. फिलिंग पॉइंटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याबाबत खबरदारी घेण्याची सूचना करण्यात येईल.
- अवधूत पवार, अभियंता, जलकामे विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com