वडाळ्यात पाणी पुरवठा पूर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडाळ्यात पाणी पुरवठा पूर्ववत
वडाळ्यात पाणी पुरवठा पूर्ववत

वडाळ्यात पाणी पुरवठा पूर्ववत

sakal_logo
By

वडाळ्यात पाणीपुरवठा पूर्ववत
गढूळ पाण्यातून नागरिकांची सुटका
वडाळा, ता. २५ (बातमीदार) ः मुंबईत एप्रिलच्या सुरुवातीलाच १५ टक्के कपात करण्यात असल्याने वडाळ्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे घोर संकट उभे राहिले होते. त्यात गढूळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. रविवार (ता. २३) पासून पुरवठा पूर्ववत झाला असून गढूळ पाण्याच्या समस्येतून सुटका झाल्याने
वडाळ्यातील रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत.
वडाळा पूर्व भागातील शिवशंकर नगर, गणेश नगर, संगम नगर, हिंमत नगर, दिनबंधू नगर आदी परिसरात कपातीसह गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी हैराण झाले होते. परिणामी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांना ५० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागत होता. परिणामी त्यांना दिवसभर पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. अनेकदा जादा पैसे मोजून पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली. पाण्याअभावी दैनंदिन जीवन विस्कळित होऊन नोकरी-व्यवसायही अडचणीत सापडला होता. ‘सकाळ’नेही वडाळ्यातील पाणीसमस्येची दखल घेत त्याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.
रविवार (ता. २३) पासून वडाळ्यातील झोपडपट्टी भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. पाणी स्वच्छ व पुरेशा दाबाने येत असल्याने ते ओढण्यासाठी पंपही लावण्याची गरज नागरिकांना भासत नाही, असे वडाळा कोरबा मिठागर परिसरातील रहिवासी भगवान कदम यांनी सांगितले.

कपातीपेक्षा परिसरात होणाऱ्या गढूळ पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी त्रस्त झाले होते. आरोग्याच्या समस्यांनी डोके वर काढले होते. महापालिका कर्मचाऱ्यांनी गढूळ पाणीपुरवठा होत असलेल्या जलवाहिन्या शोधून त्या दुरुस्त केल्याने सध्या स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. पाणीसमस्येची दखल घेतल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार.
- राजेश कुचिक, उपविभागप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट), वडाळा