
सार्वजनिक वाचनालयात विद्यार्थ्यांना विनामूल्य सदस्यत्व
कल्याण, ता. २५ (बातमीदार) : जागतिक पुस्तक दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालयाच्या शतकोत्तर हिरक महोत्सवी वर्षात शालेय विद्यार्थ्यांना वाचनालयाचे विनामुल्य सभासदत्व देण्यात आले. पुस्तकांच्या पानांमध्ये आयुष्य बदलण्याची ताकद असून, पुस्तकांतून मिळालेले संस्कार ताठ जगायला शिकवतात. वाचनाचा आनंद पुस्तकांमुळे कळतो. रोज एक पुस्तक वाचणे म्हणजे रोज नवे होत जाणे. पुस्तके कंटाळवाणे क्षण आनंदात परावर्तित करतात म्हणून विद्यार्थ्यांनो पुस्तकांशी मैत्री करा. मी पुस्तकांशी मैत्री केली म्हणून इथपर्यंत पोहचलो, असे मार्गदर्शन बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी वाचनालयाचे उपाध्यक्ष श्रीधर घारपुरे, सरचिटणीस भिकू बारस्कर, कार्यकारिणी सदस्य अरुण देशपांडे, मंगेश घाटे, मुग्धा घाटे, उत्तमराव गायकवाड, वाचनालयाच्या ग्रंथसेविका, वाचक, पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा कल्याणकर यांनी केले.