आता ‘दिघा’ नाही ‘दिघे’ रेल्वे स्थानक

आता ‘दिघा’ नाही ‘दिघे’ रेल्वे स्थानक

वाशी, ता. २५ (बातमीदार) ः नवी मुंबईतील ट्रान्सहार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून दिघे ठेवण्यात आले आहे. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर तशी कमान उभारण्यात आली आहे. दरम्‍यान रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होऊनही रेल्वे बोर्डाला महूर्त न मिळाल्याने याचे उद्घाटन रखडले आहे. त्यातच दिघा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात आल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी दिघा रेल्वे स्थानकाला ‘दिघागांव’ नाव द्यावे, अशी भूमिका घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१६ मध्ये नवी मुंबईतील ऐरोली-कळवा एलिव्हेटेड पूल आणि दिघा रेल्वे स्थानक उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. एमआरव्हीसीच्या माध्यमातून दिघा रेल्वे स्थानकाचे कामाची पूर्तता झाली आहे. मागील काही दिवसांपासून दिघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी एमआरव्हीसी, रेल्वे बोर्ड आणि राज्य शासनाकडून हालचालींना वेग आला आहे. मात्र शेवटच्या क्षणी दिघा रेल्वे स्टेशनचे नाव बदलून दिघे ठेवण्यात आल्याने उद्घाटनाचा मुहूर्त लागण्याआधीच राजकीय ग्रहण स्थानकाला लागले आहे.

संजीव नाईक यांचा पुढाकार
भाजपच्‍या वतीने माजी खासदार संजीव नाईक यांनी आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून रेल्वेच्या अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन स्थानिक भूमिपुत्रांची नगरी असलेल्या दिघा परिसरात दिघाबाबा यांच्या नावे ग्रामस्थांच्या दैवताचे मंदिर आहे, त्यांची हीच ओळख कायम रहावी. यासाठी दिघा गाव नाव देण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायत काळात सरकारी दप्तरीही असा उल्लेख आहे; तर त्यानंतर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर दिघा विभाग अशी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत आगामी कालावधीत महासभेत प्रस्ताव मंजूर करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे त्यानंतर केंद्र सरकारकडे पाठवून रेल्वे स्थानकाला दिघा गाव या नावासाठी संघर्ष करू, असे माजी खासदार नाईक यांनी सांगितले.

का झाला नावाचा गोंधळ?
रेल्वे आणि एमआरव्हीसीने केलेल्या सॅटेलाइट सर्व्हेमध्‍ये नवी मुंबईतील या जागेचे नाव दिघे नगर असे दाखवण्यात आले आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेल्वे स्थानकाच्या नावाप्रमाणे पश्चिम बंगालमध्येदेखील दिघा नावाचे जुने रेल्वे स्थानक असल्याने रेल्वे बोर्डाने या रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. रेल्वे स्थानकाच्या पहिल्या दिवशी दिघे रेल्वे स्थानक नावाचा फलक या ठिकाणी लावण्यात आला होता. त्यानंतर तो बदलून दिघा करण्यात आला. त्यानंतरच्या सात वर्षांत नावावर एकमत न झाल्याने रेल्वे बोर्डाने परस्पर दिघे रेल्वे स्थानक नाव ठेवून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

नाव बदलू देणार नाही ः खासदार राजन विचारे
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी मागील महिन्यात दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाचा आढावा घेतला होता त्यावेळी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा काही संबंध नसून नाव बदलू देणार नाही, असे मत मांडले होते; परंतु आता रेल्वे स्थानकाच्या नावात बदल झाल्यानंतर खासदार विचारे दिघे या नावाला समर्थन देणार का, की वेगळी भूमिका मांडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा
दिघा रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण झाले असून त्यांचे उद्घाटनासाठी मुहूत मिळत नाही. रेल्वे स्थानकासाठी सेंट्रल बोंर्डाची परवानगी मिळाल्यांनतर प्रत्यक्षात रेल्वे सुरु होईल. जवळपास एक महिन्यांनंतर उद्घाटन होण्याची शक्‍यता असल्याचे एमआरव्हीसीच्या आधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले; तर सेट्रलच्या परवानगी नंतर दिघा रेल्वे स्थानकात बदल झाल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com