गावठाणाला उद्यानांची प्रतीक्षा

गावठाणाला उद्यानांची प्रतीक्षा

घणसोली, ता. २५ (बातमीदार) : उद्यानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात केवळ नोडमध्ये उद्याने आहेत. सेक्टर परिसरात आणि गावठाणांमध्ये उद्याने नाहीत. गावानंतर सेक्टर परिसराची निर्मित झाली, तरी गावठाणमध्ये अद्ययावत विकास नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे गावठाणालाही उद्यान हवे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
नवी मुंबई शहरातील जनतेला दर्जेदार सुविधांसह प्रत्येक नोडमध्ये उद्याने निर्मितीवर महापालिकेने भर दिला आहे. नवी मुंबई शहर म्हणजे उद्यानाचे शहर म्हणून नावाजलेले आहे. महापालिकेच्या हद्दीत सद्यस्थितीत १८२ उद्याने विकसित करण्यात आली आहे. तर १६२ मोकळ्या जागेवर महापालिकेमार्फत हिरवळ विकसित करण्यात आली आहे. ही हरित उद्याने असल्याने उद्यानांमध्ये नागरिकांचा कल वाढता आहे. यासाठी महापालिका नवनवीन गोष्टीत भर देत आहे. उद्यानांमध्ये लहान मुलांच्या मनोरंजनाची साधने, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टे, पिण्याची पाण्याची सोय, ठिकठिकाणी ओपन जिम महापालिकेने सुरू केले आहे, मात्र या उद्यानांचा फायदा केवळ नोडमध्ये राहणार्‍यांना होत आहे. गावठाणात उद्याने नसल्याने ग्रामस्थ नाराज असून उद्याननिर्मिती कधी करणार, असा सवाल उपस्थित करत आहेत.
नवी मुंबईमध्ये नोड परिसरात सिडकोने महापालिकेला भूखंड हस्तांतरित केले, त्या भूखंडावर उद्याने उभारण्यात आली आहेत. सिडकोकडून गावठाण विभाग मात्र दुर्लक्षित होत आहे. सद्यस्थिती नवी मुंबई १८२ उद्याने असून, दिघा - १, ऐरोली -२७, घणसोली - १०, कोपरखैरणे -२०, वाशी - ३३, तुर्भे, सानपाडा-१४, नेरूळ-३६, सीबीडी - ४१ आहेत. नवी मुंबईत मोठ्या उद्यानामध्ये घणसोलीमधील सेंट्रल पार्क, कोपरखैरणेतील निसर्ग उद्यान, नेरूळमधील रॉक गार्डन वंडर्स पार्क, वाशीतील मिनी सी-शोअर आहे. देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरामध्ये नवी मुंबई शहराचे मानांकन आहे; मात्र हे मानांकन केवळ शहरी भागात दिसून येत आहे. गावठाण भागात महापालिका आणि सिडकोचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

विभागनिहाय नवी मुंबईतील उद्याने
दिघा - १
ऐरोली -२७
घणसोली - १०
कोपरखैरणे -२०
वाशी - ३३
तुर्भे, सानपाडा-१४
नेरूळ-३६
सीबीडी - ४१

*शहरातील मोठी उद्याने
घणसोलीमधील सेंट्रल पार्क
कोपरखैरणेतील निसर्ग उद्यान
नेरूळमधील रॉक गार्डन आणि वंडर्स पार्क
वाशीतील मिनी सी-शोअर

गावठाणमध्ये मोठे गार्डन जागेअभावी उभारणे कठीण आहे. मात्र, लहान उद्याने उभारू शकतो. भूखंड उपलब्ध होईल का याची माहिती घेऊन या संदर्भात विचार केला जाईल.
- नितीन नार्वेकर, महापालिका उपआयुक्त, उद्यान विभाग

नवी मुंबई महापालिका आणि सिडकोने शहराच्या विकासावर भर दिला आहे. गावठाणाचा विकास अद्याप करण्यात आलेला नाही. गावठाणातील रहिवाशांना त्या सर्व सुविधांना मुकावे लागत आहे, ज्या नोडमध्ये राहणाऱ्यांना मिळत आहेत.
- सचिन शेलार, अखिल भारतीय सेना अध्यक्ष, ऐरोली

नवी मुंबई शहरात केवळ नोड परिसरात उद्याने आणि मैदानाचा विकास करण्यात आला आहे. गावठाण परिसरात कोणत्याही प्रकारचा विकास करण्यात आला नाही. गावठाणातील नागरिक सोयी-सुविधांपासून मुकत आहेत.
- रामदास पाटील, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com