सायबरच्‍या जगात सावधानता बाळगा

सायबरच्‍या जगात सावधानता बाळगा

प्रभादेवी, ता. २६ (बातमीदार) : आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात सर्व सुविधा मिळू लागल्या, ही जरी चांगली बाब असली, तरी सायबर जगाचा आनंद घेताना सावधानता बाळगावी, असा सल्ला सी डॅकच्या वरिष्ठ संचालिका डॉ. पद्मजा जोशी यांनी दिला आहे. अमर हिंद मंडळाच्या वतीने दादर येथील सभागृहात ७६व्या वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. २५) सायबर जग आणि आपण या विषयावर डॉ. पद्मजा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सायबरच्या दुनियेत वावरताना ऑनलाईन व्यवहार करताना ओटीपी, पासवर्ड, क्‍यू आर कोड याविषयी घ्यावयाची सावधानता तसेच आपली फोटो गॅलरी, फेसबुक, व्हॉटसॲप यावरील आपली माहिती सुरक्षित कशी ठेवावी, याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
आजकाल बऱ्याच प्रमाणात सायबर गुन्हे, फसवणुकीचे प्रकार, मोबाईल हॅक होणे असे प्रकार घडत आहेत; मात्र आपण याकडे सावधानतापूर्वक पाहिले, तर आपण अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडणार नाहीत, असे डॉ. पद्मजा यांनी सांगितले.

लिंक खरी-खोटी कशी ओळखावी?
अनेकदा मोबाईलवर एक फेक लिंक पाठविली जाते व त्यावर क्लिक करून माहिती विचारली जाते. ती लिंक ओपन केल्‍यावर आपला मोबाईल हॅक होतो. ती लिंक फेक आहे की नाही, याची प्रथम खातरजमा केली पाहिजे. अशा वेळी पूर्ण मेसेज वाचावा. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. http ऐवजी https ‘s’ लावलेली लिंक असेल, तरच खातरजमा करून लिंक ओपन करावी. अशा प्रकारचे फेक मेसेज किंवा लिंकवर त्‍याची स्पेलिंग चुकीची असते, हे लक्षात ठेवा. अशा फेक लिंकवर क्लिक करून फिशिंग अटॅकला बळी पडू नका, असा सल्‍लाही डॉ. पद्मजा जोशी यांनी दिला.

ठसे शेअर करू नका
मोबाईलवर कोणीही आपला अंगठ्याचा ठसा शेअर करू नये. या ठशांचा वापर करून गुन्हेगार आपली फसवणूक करू शकतो. दुसरी फसवणूक पार्सलच्या माध्यमातून होते. कोणतेही पार्सल पैसे देऊन घेऊ नका, आधी खातरजमा करा. आपण ते पार्सल मागविले होते का? मगच निर्णय घ्या, असेही डॉ. पद्मजा जोशी यांनी सांगितले.

ॲनी डेस्क, फ्री डेस्क यांसारखे ॲप डाऊनलोड करू नये; यामुळे आपण आपला संगणक मोबाईल दुसऱ्याच्या हाती देत असतो. तो सहज त्याचा गैरवापर करू शकतो. तसेच ओटीपी अनोळखी व्यक्तीला देऊ नये. ऑनलाईन पैसे पाठवताना खात्यात कमी पैसे ठेवावेत. तसेच सर्वाजनिक ठिकाणी मोबाईल वापरताना खबरदारी घ्यावी.
– डॉ. पद्मजा जोशी, वरिष्ठ संचालिका, सी डॅक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com