मलेशियन कंपनीची १ कोटींना फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलेशियन कंपनीची १ कोटींना फसवणूक
मलेशियन कंपनीची १ कोटींना फसवणूक

मलेशियन कंपनीची १ कोटींना फसवणूक

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : साखरेची आयात करणाऱ्या मलेशियातील कंपनीची येथील गॅसरी एक्सपोर्ट इंडिया प्रा.लि. या कंपीने तब्बल १ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गॅसरी एक्स्पोर्ट कंपनीच्या दुराइराज गणपती, गणपती शर्मिला रोश आणि गणपती शर्मिला या तीन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; तर दुराईराज गणपती याला अटक करण्यात आली आहे.

व्ही. एस. आर. ओ. फ्युरिफाईड सिस्टीम ही मलेशियातील आयात-निर्यात करणारी कंपनी आहे. इतर देशातून साखर आयात करून ही कंपनी मलेशियामध्ये तिची विक्री करते. जून २०२२ मध्ये या कंपनीने क्रिस्टल व्हाईट शुगर या ब्रँडच्या साखरेसाठी गॅसरी एक्सपोर्ट इंडिया या कंपनीशी संपर्क साधला होता. मलेशियन कंपनीचे प्रतिनिधी संतोष मेनन यांनी गॅसरी कंपनीच्या सानपाडा, सेक्टर १८ येथील कार्यालयाला भेट दिली. तेव्हा कोल्हापूर येथील अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या लेटरहेडवर साखरेचा साठा उपलब्ध असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दुराईराज गणपती यांनी मलेशियन कंपनीच्या ईमेलवर तसेच व्हॉट्सअपवर साखरेचे फोटो, व्हिडीओ, इतर कंपन्यांना साखर निर्यात करण्यात येत असल्याचे इनव्हाईस पाठवले होते. त्यानंतर मलेशियन कंपनीने जून २०२२ मध्ये ४०५० मेट्रिक टन व्हाईट शुगर गॅसरी कंपनीकडून मागवली होती.

त्यावेळी गॅसरी एक्स्पोर्ट इंडिया प्रा.लि. कंपनीने सात दिवसांत साखरेचा पुरवठा करण्याचे प्रोफार्मा इन्व्हाईस पाठवून त्यांना १० टक्के रक्कम पाठवण्यास सांगितले होते. त्यानुसार मलेशियन कंपनीने १ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम पाठवून दिली. त्यानंतर मात्र या कंपनीच्या संचाकांनी वेगवेगळी कारणे सांगून मलेशियन कंपनीला साखर पाठवण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. या कंपनीच्या व्यवहाराबाबत शंका निर्माण झाल्याने मलेशियन कंपनीचे प्रतिनिधी मेनन यांनी परत एकदा सानापाडा येथील गॅसरी एक्स्पोर्ट कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली असता सदर कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे आढळून आले.
---
गॅसरीला निर्यातीची परवानगी नाही
मेनन यांनी अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याला ईमेलद्वारे संपर्क साधून त्यांच्याकडे गॅसरी एक्स्पोर्ट कंपनीकडे असलेल्या पत्राबाबत चौकशी केली. तेव्हा सदरचे लेटरहेड हे त्यांच्या साखर कारखान्याचे नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड यांनीसुद्धा साखरेच्या निर्यातीबाबत गॅसरी एक्स्पोर्ट कंपनीला कोणतीही परवानगी दिली नसल्याची माहिती दिली. यावरून गॅसरी एक्स्पोर्ट कंपनीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर मेनन यांनी या कंपनीविरोधात सानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.