
गुन्हे वार्ता
बसमध्ये मोबाईल चोरी
करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
पाच सराईत गुन्हेगारांना अटक
अंधेरी, ता. २६ (बातमीदार) ः बेस्ट बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट बाराच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. पाच सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ६८ मोबाईलसह गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा असा सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत बेस्ट बसमध्ये मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत मोठी वाढ झाली होती. आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मालाड परिसरात सापळा रचला. प्रभारी पोलिस निरीक्षक विलास भोसले व त्यांच्या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली. रिक्षातून आलेल्या तीन संशयितांना पोलिसांनी हटकण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले. मात्र, पोलिसांनी रिक्षाचालकासह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांना बाराहून अधिक चोरीचे मोबाईल सापडले. चोरीचे मोबाईल आसिफ शेख याला विकण्यासाठीई दिल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी आसिफलाही ताब्यात घेतले.
पैशांच्या अपहारप्रकरणी आरोपीस अटक
अंधेरी, ता. २६ (बातमीदार) ः मोबाईल चोरी करून एका तरुणीच्या बँक खात्यातून पैशांचा अपहार करणाऱ्या एका वॉण्टेड आरोपीला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. अनुराग ठाकूर असे आरोपीचे नाव असून तो मूळचा नागपूरचा रहिवासी आहे. पर्यटकांशी जवळीक निर्माण करून अनुरागने आतापर्यंत त्यांच्या महागड्या वस्तूंसह पैशांची चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने चोरीच्या अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
२७ वर्षांची तक्रारदार तरुणी मैत्रिणींसोबत मार्चमध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी पर्यटनासाठी गेली होती. तिथेच तिची ओळख अनुरागसोबत झाली. नंतर त्यांच्यात मैत्री झाली. तिने त्याला आपल्या घरीही बोलाविले होते. तेव्हा त्याने तिचा महागडा मोबाईळ चोरी करून तिच्या बँक खात्यातून ८१ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून तिची फसवणूक केली होती. तरुणीने बोरिवली पोलिसांत तक्रार करताच अनुरागला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.