अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : एकात्मिक बालविकास सेवा योजनेत राज्यातील दोन लाख तर ठाणे जिल्ह्यातील सहा हजाराहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे मानधनापासून वंचित राहावे लागले असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शासनाने मानधनाची रक्कम त्वरीत न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून अंगणवाडीचा गाडा हाकला जात आहे. तसेच याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ गर्भवती व स्तनदा मातांसह ० ते ६ वयोगटातील बालकांना पोषण आहार देणे आदी कामे केली जातात. कोरोना आजाराच्या प्रसार वाढू नये म्हणून, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना महानगरपालिका व गावा गावात सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तींचा सर्व्हे करण्याची जवाबदारी चोख पार पाडली. असे असताना, देखील अनेकदा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन रखडण्याचे प्रकार वांरवार घडत आहेत.
अंगणवाडी सेविकांना ८ हजार ५०० तर मदतनीसांना ४ हजार २५० इतके तुटपुंजे मानधन दिले जाते. हे मानधन दर महिन्याच्या १ ते १० तारखेपर्यंत मिळत असते. या मानधनातून या सेविका व मदतनीस आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत आहेत. तर काही कर्मचारी तर पूर्णत: या मानधनावर अवलंबून आहेत. या मानधनावरच त्यांचे घर चालत असते, अशा परिस्थितीत मानधन न मिळाल्यास त्यांची आर्थिक गणिते कोलमडून पडत आहे. अशातच मार्च व एप्रिल या दोन महिन्याचे मानधन रखडले असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे हे रखडलेले वेतन त्वरीत द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी राज्यात आंदोलन करतील असा इशारा संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com