लाचखोर सरपंच एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर सरपंच एसीबीच्या जाळ्यात

अलिबाग, ता. २६ (बातमीदार) ः गांडुळ खताच्या शेडची दप्तरी नोंद करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सरपंचाला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. मनीष नांदगावकर असे या लाचखोर व्यक्तीचे नाव असून त्याच्याविरोधात मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुरूड तालुक्यातील आदाड येथील गट नंबर ५०२ येथील जागेत एका शेतकऱ्याला गांडुळ खत बनवण्यासाठी शेड उभारायची होती. त्यासाठी त्याने उसरोली ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज केला होता. या शेडची दप्तरी नोंद करण्यासाठी सरपंच मनीष नांदगावकर याने ७५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने २४ एप्रिल रोजी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य ओळखून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशीकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने काम करण्यास सुरुवात केली. तक्रारीनुसार पडताळणी केली असता त्याने पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. मंगळवार (ता. २५) रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास ५० हजार रुपये घेताना सरपंचाला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी सरपंच मनीष नांदगांवकर याच्याविरोधात मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. त्याला बुधवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com