Thur, Sept 28, 2023

लोअर परळ उड्डाणपूल तीन महिन्यांत खुला
लोअर परळ उड्डाणपूल तीन महिन्यांत खुला
Published on : 26 April 2023, 3:50 am
मुंबई, ता. २६ : लोअरपरळच्या ना. म. जोशी मार्गावरील अवाढव्य उड्डाणपुलाचा पहिला टप्पा मे महिन्याच्या अखेरीस तर संपूर्ण उड्डाणपूल १५ जुलैपर्यंत जनतेसाठी खुला करण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. लोढा यांनी आज महापालिका व रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह या पुलाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. काम त्वरेने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. हा पूल धोकादायक झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर तो पाडून तेथे नवा पूल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या पुलाचे काम मधल्या काळात काही कारणास्तव संथ गतीने सुरू होते. मात्र आता या कामाने गती घेतली असून, पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार असल्याची माहिती देण्यात आली.