खोदकामांमुळे तळोजावासी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोदकामांमुळे तळोजावासी त्रस्त
खोदकामांमुळे तळोजावासी त्रस्त

खोदकामांमुळे तळोजावासी त्रस्त

sakal_logo
By

खारघर, ता. २७ (बातमीदार) : तळोजा फेज दोन वसाहतीत दहा वर्षांनंतर सिडकोने महिन्याभरापूर्वी डांबरीकरण केले होते. मात्र, सिडकोने पालिकेला विश्वासात न घेता पुन्हा महानगर गॅसजोडणी वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे तळोजावासींमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
तळोजा फेज दोन वसाहती सिडकोकडून; तसेच खासगी विकसकाकडून सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी लागणारे रेती, सिमेंट, विटा आदी मालवाहू वाहनांमुळे रस्ते खड्डेमय झाले होते. सिडकोने फेज दोनमध्ये उभारलेल्या गृहप्रकल्पात जवळपास १० हजार सदनिकाधारकांनी घरांचा ताबा घेतला आहे. मात्र, येथील रस्त्याची झालेली दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे रहिवासी त्रस्त होते. तळोजा वसाहत सिडकोने पालिकेकडे हस्तांतरण केल्यामुळे रस्त्याचे काम कोण करणार, असा प्रश्न रहिवाशांना पडला होता. सामाजिक, राजकीय व्यक्तींनी सिडकोकडे पत्रव्यवहार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर १६ कोटी रुपये खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण केले. आजही काही भागांत डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, याच दरम्यान सिडकोने महानगर गॅस एजन्सीला गॅस वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदकाम परवानगीसाठी पालिकेला विश्वासात न घेता दिल्यामुळे काही अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तळोजा फेज दोन वसाहतीत दहा वर्षांनंतर डांबरीकरण करण्यात आले होते. असे असताना महानगर गॅसकडून डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खोदकाम करून वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. पुढील दोन महिन्यांत पावसाळा सुरू होणार आहे. या खोदकामामुळे पुन्हा नशीबी खड्डे येणार असल्याने  रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

सिडको आणि पालिकेने पावसाळ्यापूर्वी खोदकाम केलेल्या रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास सिडकोच्या कार्यालयासमोर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- प्रवीण दळवी, रहिवासी तथा उपजिल्हाध्यक्ष रायगड मनसे

डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पुन्हा खोदकाम केले जात आहे. रस्त्यावरील  खड्ड्यांत लहान मुले खेळताना पडून अपघात होण्याची भीती वाटत आहे.
- राजेश सावंत, रहिवासी, सेक्टर १६, तळोजा फेज दोन

सिडकोने महानगर गॅसवाहिनीसाठी परवानगी दिली आहे. रस्त्यावर केलेले खोदकाम मे अखेरपर्यंत डांबरीकरण करण्यात यावे, असे पत्र पालिकेकडून दिले जाणार आहे.
- संजय कटेकर, मुख्य अभियंता, पनवेल महापालिका

तळोजा फेज एकमध्ये महानगर गॅसवाहिनीचे खोदकाम केले जात आहे. गॅसवाहिनी टाकून झाल्यावर तत्काळ रस्ते दुरुस्ती केली जाणार आहे.
- मिलिंद म्हात्रे, कार्यकारी अभियंता, सिडको